मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजपनं विधानसभा निवडणुकीची जोरादार तयारी सुरु केली आहे. भाजपकडून राज्यभर मिशन युवा मतदार सुरु करण्यात आलं असून, २८८विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर भाजप १८ ते २५ वयोगटातील २५ युवा वॅारियर्स नेमणं सुरु केलं आहे. म्हणजे भाजपनं यावेळेस ‘वन बूथ, २५ यूथ’च्या सूत्रानुसार काम सुरु केलं आहे. एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात युवांना भाजपमध्ये सामील करण्याची मोहिम आखली आहे.
भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार असल्याची माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहेकी, भाजपची तयारी नेहमीच सुरु असते परंतू १८ ते २५ वयोगटाचा युवा वॉरियर्स तयार करण्याचे अभियान आम्ही घेतलेलं आहे. हे अभियान यशस्वी होणार आहे. मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सात दिवस होतो. तसेच पुण्याचाही दौरा केला आहे. जनतेमध्ये राज्य सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही काम केलं आहे त्याबद्दल नागरिकांना आपुलकी आहे. असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
भाजपचा १ बुथ १० युथ हा युवा मोर्चा काम करतो आहे. पण आता युवा वॉरियर्स अभियान तयार केलं आहे. हा युवा मोर्चाचाच भाग असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.