उदगाव / वार्ताहर
पूरग्रस्त, शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात मदत द्या अन्यथा त्यांना घेऊन रस्त्यावर उतरून असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. स्थलांतरित कुटुंब हा निकष लावून सर्व पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी उदगाव ता. शिरोळ येथील पूरग्रस्त भागात भेट देऊन नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, पूर ओसरून आठवडा होऊन गेला पण अद्याप सानुग्रह अनुदान वगळता इतर कसलीही मदत सरकारने जाहीर केली नाही. मंत्री, नेते येतात दौरा करतात आणि गोड आश्वासन देऊन जातात, पुरामुळे जनसामान्य व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नगदी पिके व भाजीपाला हे जमीनदोस्त झाली आहेत लॉक डाऊन व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या अतोनात नुकसान झाले असून त्यांना मदत त्वरित मिळणे गरजेचे आहे, मात्र राज्य शासन केंद्र सरकारकडे व केंद्र शासन राज्य सरकारकडे याबाबत बोट दाखवत आहे, यामुळे पूरग्रस्त व शेतकऱ्यांचे हेळसांड होत आहे, त्यांना येत्या आठ दिवसात भरीव मदत न जाहीर झाल्यास पूरग्रस्त शेतकर्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
शासनाने पूरग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान वाटपात जे निकष लावले आहेत त्यात बदल करणे गरजेचे असून घराभोवती पाण्याचा वेढा पडला मात्र घरात पाणी गेले नाही म्हणून त्यांना अनुदान मिळणार नसेल तर संघर्ष अटळ आहे. पुराच्या काळात एक कुटुंब स्थलांतर होण्यासाठी 15000 च्या वर खर्च आला आहे मात्र केवळ त्यांच्या घरात पाणी गेले नाही म्हणून अनुदान मिळणार नसेल तर ते चुकीचे आहे ,स्थलांतरित कुटूंबांना दिला जाणारा निर्वाहभत्ता हा चुकीचा असून तो तुम्हीच ठेवा असे म्हणत, स्थलांतरित हा कुटुंब हा निकष लावून सानुग्रह अनुदान देण्यासाठी आपण लढा उभा करू असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य मन्सूर मुल्लानी, उपसरपंच रमेश मगदूम, मेघराज वरेकर, सौरभ पाटील, सम्मेद मगदूम, जगन्नाथ पुजारी, संदीप पुजारी, प्रकाश बंडगर, इत्यादी सर्व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.