प्रतिनिधी / नागठाणे :
माजगाव (ता. सातारा) येथील उरमोडी नदीवर असणारा कमी उंचीचा पूल दरवर्षी अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली जातो. यावर्षी नुकत्याच आलेल्या पुरामुळे हा पूल मध्यभागी खचला आहे. दरम्यान गेल्या 20 वर्षापासून पुलाची उंची वाढवावी व माजगाव-आंबेवाडी रस्त्यावर निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सातत्याने होऊन देखील अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. पुलाचा शासन दरबारी प्रस्ताव असला तरी याबाबत कोणताही ठोस निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. याबाबत वेळीच दखल घेऊन संभाव्य पुरपरिस्थिती व पुलावरून पुराच्या पाण्यातून होणारा धोकादायक प्रवास बंद होण्यासाठी वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
साताऱ्यापासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर असलेले 1044 लोकसंख्येचे माजगाव हे गाव उरमोडी नदीतीरावर वसलेले गाव आहे. माजगाव हे महामार्गालगत गाव असले तरी अजूनही या गावास भौतिक सुविधापासून वंचित असल्याचे येथील समस्या वरून नेहमीच दिसून येत आहे. वर्णे गटात व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या माजगाव गावात अद्याप रस्त्याच्या व पुलाच्या दुरवस्थेमुळे वाहतूक व दळणवळणाचा प्रश्न जटील होऊन बसला आहे. माजगाव येथील उरमोडी नदीवरील असणारा कमी उंचीचा पूल व माजगाव फाटा ते आंबेवाडी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था यामुळे हे गाव स्वयंपूर्ण असूनही, या समस्येमुळे विकासकामांत परिपूर्ण दिसत नाही. या उरमोडी नदीवर असणाऱ्या पूलाची उंची वाढवावी व आंबेवाडीपर्यंत रस्त्यावर ठोस निर्णय घेत निधी उपलब्ध करावा अशी मागणी गेल्या 20 वर्षापासून सातत्याने करत आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात कमी उंचीचा पूल कायम पाण्याखाली जाऊन परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नागठाणे येथे येण्यासाठी तीन किलोमीटर अंतर असूनही केवळ पुलावर पाणी असल्याने आंबेवाडी, अपशिंगे(मि.),बोरगाव मार्गे दहा किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. नागठाणे येथे आलेल्या दैनंदिन कामासाठी अथवा शाळा, महाविद्यालयात आलेले विद्यार्थी कधी पुलाच्या अलीकडे तर कधी पुलाच्या पलीकडे अडकून बसतात. अंदाजे सात ते आठ फुटापर्यंत कमी उंचीच्या पुलावर दोन ते तीन महिने कधी कंबरेपर्यंत तर कधी गळ्यापर्यंत पाणी असल्याने यातूनच धोका पत्करून पाण्यातून जाताना नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होत आहे. यात या पुलाच्या दोन मोर्या गेल्या दोन वर्षांपासून बंद असून पूलाचा मध्यभाग पाण्याच्या तीव्रतेमुळे खचला आहे.
गेल्या वीस वर्षांपासून पूलाची उंची वाढवावी अशी मागणी होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी पुराचा धोका निर्माण होत असताना शासन दरबारी धुळ खात पडलेल्या माजगाव ग्रामस्थांच्या मागणीला कधी चालना मिळणार हे मात्र न सुटणारे कोड होऊन बसलं आहे.









