मुंबई/प्रतिनिधी
राज्यातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षसतील नेते एकवटले आहेत. तर काही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं आहे. याच मुद्द्यावरुन आता भाजपाचे चंद्रकांत बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेसला थेट सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं असून यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ओबीसी विरोधी पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण देण्यासंदर्भात तुम्ही काहीही करा. मग ते इम्पिरिकल डेटा असेल किंवा इतर काही. पण जर तुम्ही डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळवून दिलंत तरच आम्ही समजू की तुमच्या मनात ओबीसी समाजाविषयी काहीतरी आहे. डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही झालं तर नेत्यांना आम्ही रस्त्यावर फिरु देणार नाही, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. २०२२ च्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत.








