कोंडअसुर्डे जांभूळवाडीतील प्रकार
वार्ताहर/ संगमेश्वर
राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असलेल्या कोंडअसुर्डे जाभूळवाडी येथे बंद घर फोडून चोरटय़ाने 6 लाख रुपयांची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. भरवस्तीत असलेल्या घरांमध्ये रोख रक्कम व दागिन्यांची चोरी झाल्याने चोरटा माहितगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही चोरी शनिवार रात्री ते रविवार सकाळच्या दरम्याने घडली.
याबाबत डॉ. तानाजी सदाशिव दौंड (कोंड असुर्डे जांभूळवाडी ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तानाजी दौंड शनिवारी सकाळी घर बंद करून सोलापूर जिह्यातील आंधळगाव या आपल्या सासुरवाडीस गेले होते. दरम्यान बंद घराच्या खिडकीचे स्लाईंडिंग उचकटून चोरटय़ाने खिडकीवाटे घरांमध्ये प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यामध्ये ठेवलेले 1 लाख 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 95 हजार रुपयांचे नेकलेस, 80 हजार रुपयांच्या बांगडय़ा, 12 व 25 हजार रुपयांच्या आंगठय़ा, 25 हजार रुपयांचे एक सर मंगळसूत्र या सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाख रुपये रक्कम, अशी 5 लाख 97 हजारांची चोरी झाली आहे.
तानाजी सासरवाडीहून रविवारी परतले असता कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.