प्रतिनिधी / कोल्हापूर
सोमवारी अनेक शिक्षकांनी शाळेऐवजी जिल्हा परिषदेत हजेरी लावण्याचे चित्र होते. याची गंभीर दखल घेऊन जि.प.सदस्य प्रा.शिवाजी मोरे यांनी सीईओ संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन मोकाटपणे फिरणाऱया शिक्षकांची तक्रार केली. शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली राबवून त्यांच्या शैक्षणिक कामकाजावर वॉच ठेवण्यासाठी गुगल ऍप विकसित करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन बायोमेट्रिक हजेरी आणि गुगल ऍप विकसित करण्यासाठी 20 लाख रूपयांची तरतूद केली जाईल अशी ग्वाही सीईओ चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व शिक्षकांना लवकरच बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार असून त्यांच्या शैक्षणिक कामावर गुगल ऍपची करडी नजर राहणार आहे.
जि.प.सदस्य मोरे मतदारसंघातील कामकाजासाठी सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी त्यांना जिल्हा परिषदेचे अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या आवारात रेंगाळताना दिसले. सोमवार हा आठवडÎातील शाळेचा पहिला दिवस असताना ते शैक्षणिक कामकाज सोडून जिल्हा परिषदेत आलेच कसे ? असा प्रश्न सदस्य मोरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱयांपुढे उपस्थित केला. यावेळी मोरे यांनी थेट सीईओ चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही तक्रार मांडली. बायोमेट्रिक हजेरीसह शिक्षक खरोखरच शाळेत तास घेत आहेत काय ? यावर वॉच ठेवण्यासाठी गुगल ऍप विकसित करण्याची मागणी केली. या मागणीनुसार सीईओ चव्हाण यांनी यासाठी तत्काळ 20 लाखांची तरतूद करण्याची ग्वाही दिली.