आरटीपीसीआर तपासणी अहवाल नसल्याने पोलिसांनी केली कारवाई, तपासणी वाढविली
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कडक निर्बंध लादण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी करताच सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर खबरदारी वाढविण्यात आली असून आरटीपीसीआर तपासणी अहवाल नसलेल्या प्रवाशांना त्यांच्या वाहनासह माघारी धाडण्यात येत आहे.
रविवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरिष्ट अधिकाऱयांनी सीमेवरील चेकपोस्टना भेटी देऊन पाहणी केली. शनिवारी राज्य सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. यापूर्वी दोन लस घेतलेल्यांना अहवालाशिवाय राज्यात प्रवेश दिला जात होता. आता हा नियम बंद करण्यात आला आहे.
दोन लस घेतली तरी केरळ व महाराष्ट्रातून येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे सक्तीचे करण्यात आले आहे. मिरजेहून प्रवाशांना घेऊन कर्नाटकात येणारी बस अथणी पोलिसांनी रविवारी मंगसुळीजवळ अडविली. कोणत्याही प्रवाशाकडे आरटीपीसीआर अहवाल नव्हता. त्यामुळे बससह प्रवाशांना माघारी पाठविण्यात आले. निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकारी कोगनोळीत चेकपोस्टवर तळ ठोकून होते.
कोगनोळी चेकपोस्टवरही हे चित्र पहायला मिळत होते. खासगी आराम बस, सरकारी बसेस व कारमधून येणाऱया प्रवाशांची सक्तीने तपासणी केली जात आहे. ज्यांच्याजवळ आरटीपीसीआर अहवाल नाही, अशा प्रवाशांना परत धाडण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
खानापूर, संकेश्वर, यमकनमर्डी, निपाणी शहर, निपाणी ग्रामीण, अथणी व कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एकूण 22 चेकपोस्ट आहेत. सरकारी मार्गसूचीनुसार शनिवारी वाहने अडवून तपासणी अहवाल नसेल तर त्यांना ‘वॉर्निंग’ देऊन सोडण्यात आले. रविवारी सकाळपासून मात्र प्रत्येक वाहन अडवून आरटीपीसीआर निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले.









