निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा : मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /बेंगळूर
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना दूर ठेवून सरकार स्थापणे अशक्य आहे. या सरकारला कोणतीही समस्या आल्यास आपला पाठिंबा राहील. पण कालावधी पूर्ण होण्यापूर्वी निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा आम्हाला नाही, असे निजद सर्वेसर्वा तथा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना सांगितले. बेंगळूरच्या पद्मनाभनगरमधील देवेगौडा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री बोम्माई यांनी रविवारी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि त्यांच्या वडिलांनी आपल्यासोबत काम केले आहे. त्यांनी आपली भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रविवारी त्यांनी आपली भेट घेतली. राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांना सल्ला दिला आहे. उर्वरित दोन वर्षे पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
येडियुराप्पा यांची पायउतार करण्यास आम्ही सांगितलो नव्हतो. 75 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्याला संधी देत नाही, असे केंद्राने सांगितले आहे. तरीही येडियुराप्पा यांना दोन वर्षाची संधी दिली होती. त्यानुसार त्यांना राजीनामा देण्यास सांगून बोम्माई यांना मुख्यमंत्री केले आहे. राजकारणासाठी वय महत्त्वाचे नसून काम करण्याची आवड महत्त्वाचे असल्याचेही देवेगौडा म्हणाले.









