नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 33 टक्क्मयांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रविवारी दिली. जुलैमधील जीएसटी महसूल वाढल्यामुळे कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचे दिसत आहे. जुलैमध्ये झालेले एकंदर जीएसटी संकलन हे चालू आर्थिक वर्षातील दुसऱया क्रमांकाचे विक्रमी संकलन ठरले आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये 1.41 लाख कोटी इतके जीएसटी संकलन नोंद झाले होते.
मागील वर्षी जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजे जून 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे 92,849 कोटी रुपये होते. एकंदर मागील वर्षीच्या जुलै महिन्याबरोबरच मागील महिन्यापेक्षा (जून 2021) जुलैमधील संकलन वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. जुलै, 2021 मध्ये जीएसटी संकलनाचा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 33 टक्के अधिक आहे. यामध्ये 1 ते 31 जुलैपर्यंत भरलेले जीएसटी रिटर्न, त्याच कालावधीसाठी आयजीएसटी आणि मालाच्या आयातीवर जमा केलेला सेस यांचा समावेश आहे.
जुलैमधील जीएसटी महसूल 1,16,393 कोटी रुपये
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1 लाख 16 हजार 393 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी 22 हजार 197 कोटी रुपये, राज्य जीएसटी 28 हजार 541 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 57 हजार 864 कोटी रुपये (त्यापैकी 27,900 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवरील) आणि उपकर 7 हजार 790 कोटी रुपये अशाप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे.