प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. पूर्ण होणारी कामेदेखील निकृष्ट दर्जाची आहेत. बरीच कामे रखडली आहेत. पाच वर्षे झाली तरी अजून कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे अनेकांचे जीव या कामांमुळे जात आहेत. तेव्हा येत्या सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी खड्डय़ांमध्ये पडून अनेकांचा जीव गेला आहे. मंडोळी रस्त्यावर एकाचा जीव गेला तर नुकताच मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका वृद्धाचा मानेत लोखंडी सळय़ा घुसून मृत्यू झाला. अशा घटना या कामांमुळे घडत आहेत. तेव्हा ही कामे तातडीने पूर्ण करा. कामे करत असताना त्यांचा दर्जा तपासला जात नाही. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या स्मार्ट सिटीचा दर्जा उघडकीस आला आहे. त्यामुळे सदर कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना देण्यात आले. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. शरद देसाई, ऍड. आर. एल. नलवडे, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. व्ही. आय. महांतशेट्टी, ऍड. बसय्या हिरेमठ, ऍड. जी. डी. भाविकट्टी, ऍड. मोहन नंदी उपस्थित होते.









