प्रतिनिधी / आचरा:
मालवण तहसीलदारांच्या सूचनेनुसार विनापास वाळू वाहतूक करणाऱया व्यावसायिकांवर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. चिंदर तेरई येथून आचरा कणकवली मार्गावर विना पास वाहतूक करणाऱया डंपरवर आचरा मंडल अधिकारी आणि तलाठय़ांनी सीमांबा येथे कारवाई करत डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात दिला.
याबाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डंपरचालक दीपक सीताराम खरात हा डंपर (एमएच 07 सी 6312) मधून अंदाजे तीन ब्रास वाळू वाहतूक करताना महसूल कर्मचाऱयांना आचरा सीमांबा येथे शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास आढळून आला. याबाबत त्यांच्याकडे पासची विचारणा केली असता, तो आढळला नाही. त्यामुळे या वाहनावर कारवाई करत आचरा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. ही वाळू बंटी भोवर यांच्या रॅम्पवर भरली गेली असल्याची माहिती आचरा मंडल अधिकारी मेघनाथ पाटील व तलाठी अनिल काळे यांनी दिली. मालवण तहसीलदारांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई मालवण तहसीलदारांच्या सूचनेनुसार आचरा मंडल अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी अनिल काळे यांनी केली. या कारवाईत वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाळे, चिंदर तलाठी संतोष जाधव, चिंदर भटवाडी तलाठी योगेश माळी, हडीच्या तलाठी प्रीतम भोगटे, पोलीस स्वप्नील भोवर, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, कोतवाल गिरीश घाडी सहभागी झाले होते.









