ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत आणि चीन यांच्यातील दीर्घकालीन सीमा वाद सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. आज दोन्ही देशांमधील कोअर कमांडर स्तरावरील चर्चेची 12 वी फेरी सकाळी 10.30 च्या सुमारास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी भागातील मोल्डो येथे होणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे
या बैठकीत हॉट स्प्रिंग्ज आणि गोग्रा हाइट्स एरियामधून भारत आणि चीन सैन्य वापसीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही देशांमधील चर्चेची 11 वी फेरी 9 एप्रिल रोजी एलएसीच्या भारतीय बाजूने येणाऱ्या चुशूल येथे झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य आणि शस्त्रे पॅन्गोंग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण कोपऱ्यातून काढून ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, संघर्षग्रस्त इतर ठिकाणी सैन्य मागे घेण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही.









