ऑनलाईन टीम / मुंबई
राज्यातील अनेक जिल्ह्यांसह कोकणात पावसाने हाहाकार उडाला आहे. या आपत्तीग्रस्तांची दखल घेत त्यांना मदत करण्यापासून ते त्यांना मदत करण्याच्या कारणावरुन राज्याच्या राजकीय पटलावर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात अनेकवेळा आरोप – प्रत्यारोप झाले आहेत. यात आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ही बऱ्याचदा महाविकास आघाडीसह शिवसेनेवर टीका केली आहे. याची दखल घेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी राणे पिता पूत्रांवर एका वृत्त वाहिनीशी बोलताना टीका केली. ” नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत” असे वक्तव्य त्यांनी केले.
भास्कर जाधव म्हणाले की, “नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेल. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले. भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रियेवर राणे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देणार हे उत्सूकतेच ठरणार आहे.








