ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बुधवारी देशात 43 हजार 654 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 640 जणांनी आपला जीव गमावला आहे. या सोबतच 41 हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. कालच्या तुलनेत गुरूवारी कोरोना बाधित रूग्णांमध्ये किंचीत घट झाल्याचे समोर आले असून आज 43 हजार 509 इतक्या नव्या बाधितांचे निदान करण्यात आले आहे. तर दिवसभरात 38 हजार 465 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत देशात एकूण 3 कोटी 7 लाख 1 हजार 612 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या देशात 4 लाख 3 हजार 840 इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू आहे. दरम्यान, सध्या देशात सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.28 टक्के तर रिकव्हरी रेट हा 97.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा 5 टक्क्यांनी कमी झाला असून सध्या तो 2.38 टक्क्यांवर आहे. तर दैनंदिन येणाऱ्या कोरोना आकडेवारीनुसार, पॉझिटिव्हीटी दर हा 2.52 टक्के असा असून त्यात 5 टक्क्यांनी घसरण होताना दिसते आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोना बाधितांमध्ये चढ-उतार बघायला मिळत असला तरी देखील कोरोना चाचणी करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. देशात सध्या 46.26 कोटी नमुने कोरोना चाचणीसाठी तपासण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २९ जुलैपर्यंत देशभरात 45 कोटी 07 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 46 कोटी 26 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17.28 लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.









