बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर सोमवारी राजीनामा दिला आहे. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून ५ नावे मुख्यत्वे चर्चेत आहेत. मात्र, त्यात केंद्रातील मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशींच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. प्रल्हाद जोशी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार की राज्यातील नेत्याकडेच राज्याची सूत्रे जाणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत प्रल्हाद जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकचे खासदार आहे. त्यानंतर बी. एल. संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. तसेच परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचंही नाव मुख्यत्वे चर्चेत आहे. या तीन नावांखेरीज भाजप नेते मुर्गेश निराणी आणि बसवगौडा पाटील यतनाळ यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. तसेच भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय आहेत.
राजीनामा देण्यापूर्वी येडियुरप्पांनी ठेवल्या तीन अटी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीन अटी ठेवल्या होत्या. या अटी पक्षश्रेष्ठींनी मंजूर केल्याचं सांगितलं जात आहे.
येडियुरप्पांचा मोठा मुलगा खासदार बी. एस. राघवेंद्र यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं
येडियुरप्पा यांचा दुसरा मुलगा आणि कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष बीएस विजेंद्र यांना कर्नाटकाच्या मंत्रिमंडळात घ्यावं
तसेच कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री आपल्याच सहमतीने निवडण्यात यावा.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण आहेत?
प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
मुरगेश निराणी हे येडियुरप्पा सरकारमध्ये कोळसा मंत्री आहेत. ते लिंगायत समुदायातील आहेत.
बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे गृहमंत्री असून येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात.
लक्ष्मण सवदी हे उपमुख्यमंत्री आहेत. तेही लिंगायत समुदायातील आहेत.
बसवगौडा पाटील-यतनाळ हे विजयपुराचे आमदार आहेत. तेही लिंगायत समुदायातून येतात. प्रथम त्यांनीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती.