वृत्तसंस्था/ कोलंबो
‘सामनावीर’ भुवनेश्वरकुमार आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी देताना यजमान लंकेचा 38 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक (50) तर भुवनेश्व़रकुमारने 4 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 164 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव 18.3 षटकांत 126 धावांत आटोपला. लंकेची स्थिती एकवेळ भक्कम होती पण त्यानंतर त्यांचे शेवटचे सहा गडी केवळ 15 धावांची भर घालत बाद झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

भारताच्या डावाला खराब सुरूवात झाली. चमिराच्या पहिल्या चेंडूवर पदार्पणवीर पृथ्वी शॉ भानूकाकरवी आपले खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार धवन आणि या सामन्यात अंतिम अकरा खेळाडू संधी मिळणाऱया संजु सॅमसन यांनी 6 षटकांत 51 धावांची भागिदारी केली. सॅमसनने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. हसरंगाने त्याला पायचीत केले. धवन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने संघाच्या धावसंख्येला बऱयापैकी आकार देताना तिसऱया गडय़ासाठी 62 धावांची भर घातली. शिखर धवनने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. करूणारत्नेने त्याला झेलबाद केले. सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकारांसह 50 झळकविल्या. सूर्यकुमारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरे अर्धशतक असून हसरंगाने त्याला बदली खेळाडू मेंडीसकडे झेल देण्यास भाग पाडले. हार्दिक पंडय़ा पुन्हा अपयशी ठरला. त्याने 12 चेंडूत 10 धावा जमविल्या. इशान किशनने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20 तर कृणाल पंडय़ाने नाबाद 3 धावा जमविल्या. भारताच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे चमिरा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 2 तर करूणारत्नेने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये असालंकाने 26 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44, अविष्का फर्नांडोने 23 चेंडूत 3 चौकारांसह 26, भानुकाने 7 चेंडूत 2 चौकारांसह 10, कर्णधार शनाकाने 14 चेंडूत एक षटकारांसह 16 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. अनुभवी भुवनेश्वरकुमारने 22 धावांत 4 तर नवोदित दीपक चहरने 24 धावांत 2 गडी बाद केले. कृणाल पंडय़ा, वरूण चक्रवर्ती, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात वरूण चक्रवर्तीने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तसेच पृथ्वी शॉने टी-20 प्रकारात पदार्पण केले.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 5 बाद 164 (सूर्यकुमार यादव 50, धवन 46, सॅमसन 27, इशान किशन नाबाद 20, हार्दिक पांडय़ा 10, कृणाल पांडय़ा नाबाद 3, चमिरा 2-24, हसरंगा 2-28, करूणारत्ने 1-34).
लंका 18.3 षटकांत सर्वबाद 126 (असालंका 44, अविष्का फर्नांडो 26, शनाका 16, भानुका 10, बंदारा 9, भुवनेश्वरकुमार 4-22, दीपक चहर 2-24, कृणाल पंडय़ा 1-16, चक्रवर्ती 1-28, चहल 1-19, हार्दिक पंडय़ा 1-17.









