आता सगळ्यांनी पुढे होऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदारी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे अन्यथा दरवर्षी अशा अस्मानी संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. आता खरी गरज आहे ती राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची, त्यांचे जनजीवन सुरळीत करण्याची.
काल 26 जुलै 2021. बरोबर 16 वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास अर्ध्याहून अधिक मुंबई दोन दिवस पाण्याखाली होती. या पावसाने राज्यात जवळपास 1100 हून अधिक बळी घेतले होते. 26 जुलै तारीख जवळ आली की लोकांना अजूनही तो काळा दिवस आठवतो. गेल्या आठवडय़ात राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह प. महाराष्ट्र आणि कोकणात अचानक पावसाचा जोर वाढल्याने मोठे नुकसान झाले. राज्यात पूल आणि दरडी कोसळल्यामुळे जवळपास 150 लोकांचा मृत्यु झाला असून अद्यापही 100 लोक बेपत्ता आहेत. गेल्या काही वर्षात पावसामुळे झालेले हे मोठे नुकसान आहे.
या पावसामुळे कोकण आणि प. महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले असून ते पूर्वपदावर यायला अजून काही दिवस लागतील. 2019 साली प. महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व भागातून मोठय़ा प्रमाणात मदतीचा ओघ पुढील कित्येक दिवस सुरू होता. लोकांनी सर्व प्रकारची मदत करताना माणुसकीचे दर्शन घडविले. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे आज सर्वच अडचणीत असताना पूरग्रस्तांना यावेळी इतर सामाजिक संस्था तसेच लोकांकडून किती मदत होईल याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह असून सरकारनेच आता याबाबत पुढाकार घेऊन या लोकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुढाकार घेतला पाहिजे.
निसर्ग आणि तोक्ते या दोन चक्रीवादळांचा मोठा फटका समुद्र किनारी असलेल्या कोकणातील गावांना चांगलाच बसला. यातून कोकण सावरत नाही तोवर आता अतिवृष्टी आणि पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आहे.
मुंबईत 17 जुलैला झालेल्या पावसात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मुंबईत दरडी कोसळून जवळपास 40 हून अधिक लोकांचा बळी गेला. मुंबईत अद्यापही कोरोनामुळे जनजीवन सुरळीत झालेले नाही. त्यातच सरकारचे लॉकडाऊनचे अनेक निर्बंध आजही कायम आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची अद्याप मुभा देण्यात आलेली नाही. वर्क फ्रॉम होम असल्याने शनिवारी मोठी जीवितहानी टळली. नाहीतर मृतांचा आकडा अजून वाढला असता. त्यातच महाराष्ट्रात कोणतीही समस्या आली तरी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा राजकारणाचा सामना रंगतच असल्याने याचा फटकादेखील सर्वसामान्य लोकांना बसत आहे.
एकीकडे बोलायचे की ही वेळ टीका करण्याची नाही. मात्र दुसरीकडे राज्याने केंद्रावर आणि राज्यातील विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका करायची एवढा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू असल्याने प्रशासनदेखील या गोष्टीचा फायदा घेत असल्याचे वारंवार बघायला मिळत आहे.
मुख्यमंत्री आषाढी एकादशीला स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले. आषाढी एकादशीची शासकीय पूजा मुख्यमंत्री करतात, मात्र मुख्यमंत्र्यांनी इतर ठिकाणी देखील अशा पद्धतीने स्वतः गेले पाहिजे. मुख्यमंत्री गेल्यावर प्रशासकीय यंत्रणा हलते. ताबडतोब निर्देश दिले जातात. त्यामुळे जिथे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते तेथे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते.
2014 साली उत्तराखंड केदारनाथ येथे आलेल्या महाप्रलयाच्या वेळी तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री सुरेश धस यांनी स्वतः उत्तराखंडमध्ये आठ दिवस तळ ठोकत राज्यातील भाविकांना सुरक्षित आणले होते. त्यांच्या गाठीशी असलेला अनुभव लक्षात घेत सरकारने त्यांच्याकडून काही सूचना घेतल्या पाहिजेत, नाही तर आज सर्व नेतेमंडळी केवळ दौरा करतात. फोटो काढताना दिसतात.
एकाच वेळी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, केंद्रीय मंत्री हे सर्वजण एकाच ठिकाणी दौरा करतात. त्यामुळे जनतेची विचारपूस कमी आणि चमकोगिरी करणारे जास्त असा प्रकार बघायला मिळत आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यातच आपल्या पक्षाच्या नेत्यासोबत दौरे करताना लोकांच्या वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे. आमदार खासदारांनी संयम ठेवला पाहिजे. रविवारीच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेला ज्या पद्धतीने दमदाटी केली ते योग्य नव्हते.
आपल्या नेत्यासमोर चमकोगिरी करण्याची स्पर्धाच सध्या लागल्याचे बघायला मिळते. जर ती महिला बोलत असेल की आमदार आणि खासदारांचा दोन महिन्याचा पगार द्या. पण जाधव यांनी अशावेळी संयम दाखविण्याऐवजी 6 महिन्याचा पगार दिला तरी काही होणार नाही असे बोलत त्या महिलेचा अपमान केला. त्यामुळे लोकांच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजेत तर दुसरीकडे मुंबईतील पावसाच्या वेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अकेलेचे तारे तोडताना मुंबईत मुसळधार पाऊस झालेला असताना त्यांनी जर मुंबईत भिजलेल्या कपडय़ांचा अजून सेल लागला नाही याचा अर्थ मुंबईत तसा पाऊस पडलेला नाही, तर कालच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणातील पूर परिस्थितीचा दौरा केला, यावेळी जिल्हाधिकाऱयांना खडसावताना सीएम बीएम गेले उडत असे बोलत राणे यांचा तोल गेला, त्यामुळे आता वेळ कुठली आहे हे जर राजकारण्यांना समजत नसेल आणि केवळ प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि आरोप प्रत्यारोपच होणार असतील तर बाधित लोकांचे जनजीवन सुरळीत व्हायला अजून काही दिवस वाट बघावी लागणार. तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दौरा करताना गुजरातला 1 हजार कोटीच्या मदतीची घोषणा केली, महाराष्ट्रातही या वादळाचा मोठा तडाखा बसला.
मात्र महाराष्ट्राला काही जाहीर केले नाही. त्यामुळे किमान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, अन्यथा 2019 च्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यात आलेल्या महापुराच्या वेळी लोकांना आलेला राजकारणी लोकांचा अनुभव बघता लोकांनी त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही लोकांना घरी बसवले होते, लोक सगळे लक्षात ठेवतात.








