आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश : भुईबावडा घाट किमान सहा महिने बंद?
- हायवेप्रश्नी नितीन गडकरींना अहवाल देणार
- नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सर्व्हे होणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
मुंबई-गोवा महामार्गाचे काम नव्याने झालेले असताना अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर पाणी कसे आले आणि रस्त्यावर पाणी साचून कसे राहते? याची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला जाणार आहे. तर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सर्व्हे करून अहवाल द्यावा आणि कृती आराखडा तयार करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच या बाबतची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम नव्याने झाले असतानाही अतिवृष्टीमध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी आले. तसेच रस्त्यावर पाणी साचून राहते. याबाबत अनेक तक्रारी आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रकारे मार्ग ठेवले नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांनी रस्स्यावर पाणी साचण्याच्या कारणांची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल केंद्रीय मंत्र्यांना सादर केला जाणार आहे.
जिल्हय़ात काही ठिकाणी कमी पाऊस होऊन सुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामागे नद्यांमध्ये गाळ साचल्याने पूर येत असावा, असे वाटते. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व नद्यांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे आणि गाळ काढण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. तसेच गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतींनी परवानगी मागितली, तर जिल्हाधिकाऱयांर्फत परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
भुईबावडा घाटातील रस्त्यांना मोठय़ा भेगा गेल्या आहेत. हा घाट लवकर सुरू होणे कठीण असून सहा-सात महिने लागतील. या घाटमार्गाची तज्ञांमार्फत पाहणी केली जाणार आहे. घाट अतिशय धोकादायक बनला आहे. यामुळे तज्ञ काय अहवाल देतील, यावर सर्व अवलंबून आहे. कदाचित घाट बंदच करावा लागेल, असे अनेकांचे मत आहे. पण आताच काही सांगता येणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.









