तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या आदेशात काहीच बदल करण्यात आले नाहीत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी नवा आदेश काढून यापूर्वीचेच आदेश कायम राहतील, असे सांगितले आहे.
शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी 28 जूनपासून सोलापूर शहरात लॉकडाऊन लावला आहे. या आदेशानुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवता येत आहेत, तर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक वगळता सर्व बंद आहे. सोलापूर ग्रामीण भागातही दुपारी 4 वाजेपर्यंतची अट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दुकानांसाठी सायंकाळी 7 पर्यंत सवलत देण्याचा विचार चालू असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत अधिकृत आदेश आला नाही. पुण्याप्रमाणे सोलापुरातही सायंकाळी 7 पर्यंत दुकानांना वेळेची सवलत मिळेल अशी आशा दुकानदारांना होती, मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी लॉकडाऊनच्या अनुषंगाने आदेश काढून जुनेच आदेश यापुढेही कायम राहतील असे नमुद केले