पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरे यांची माहिती
विशेष प्रतिनिधी/ सांगली :
पाटबंधारे विभागाच्या नियोजनाप्रमाणे कराडमध्ये 24 फूट, बहे मध्ये 16 तर ताकारी दहा फूट पाणी पाणी उतरले आहे. भिलवडी, सांगली, अंकली आणि म्हैसाळ हा भाग जवळपास समान पातळीवरचा आणि कमी उतराचा असल्याने पाणी उतारास विलंब लागत असला तरी सोमवारी सकाळी पाणी पातळी दोन फुटाने कमी होऊन 52 वर तर सायंकाळपर्यंत 47 फुटावर पोहोचेल असा विश्वास पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लालासाहेब मोरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
2005, 06, 2019 या महापूर कालावधीतील नियोजनात सहभागी असलेल्या मोरे यांचा महापूर आणि सांगलीच्या स्थितीचा अभ्यास आहे. शनिवार ते रविवारी सायंकाळपर्यंत सांगलीत पाण्याची फुग निर्माण झाल्याने नागरिक चिंतेत असून अनेक अफवा उठताहेत. या पार्शवभूमीवर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगलीकर जनतेला घाबरून जाऊ नये, पाणी उतरू लागले आहे असा विश्वास व्यक्त केला.
मोरे म्हणाले, समाज माध्यमावर पसरणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका. कराडला 24 फूट पाणी उतरले आहे. सांगली जिल्ह्यात बहे 16 आणि ताकारी दहा फूट उतरले आहे. भिलवडीमध्ये 12 तासात केवळ दोन फुटांनी उतरलेले आहे. तसेच सांगलीत सात तासानंतर 1 इंच उतरले. हे महापूर अनुभवलेल्या जनतेलाही नवीन नाही. पुराची परिस्थिती निर्माण झाली हे तर स्पष्ट आहे. कोयना धरण परिसरात आणि वारणा, पंचगंगेच्या परिसरातील पर्जन्यवृष्टीचा विसर्ग एकाच वेळी कृष्णा नदीला मिळाल्याने सांगली शहराच्या पाणी पातळी ज्या ठिकाणी पूर्ण निर्माण झालेले असते. त्यामुळे पाणी पुढे जाण्यास विलंब होतो आणि संथ गतीने उतरू लागते. रविवार सकाळी सहा पासून सायंकाळी सहा पर्यंत भिलवडीची पाणी पातळी केवळ दोन फूट उतरली. तर सांगलीत सात तास पाणी स्थीर राहून 1 इंच उतरले. सायंकाळी 54.5 पातळी होती. सकाळी ती किमान दोन ते अडीच फूट कमी होऊन 52 वर पोहोचेल. इतका वेळ लागण्याचे कारण भिलवडी, सांगली, अंकली आणि म्हैसाळ या भागात फारसा उतार नाही. एकच पातळीवर नदी धावते. त्यात हरिपूर आणि नृसिंह वाडी येथे गती कमी होते. सांगलीत फुग् निर्माण होते. पण सोमवारी सायंकाळपर्यंत 6 ते 7 फूट पाणी निश्चितच कमी होऊन 47 फुटावर सांगलीची पाणी पातळी पोहोचेल. राधा नगरी धरणाचे पाणी जरी सुरू झाले तरीही ते पोहोचायला उद्याचा दिवस लागेल तोपर्यंत सांगलीचे पाणी उतरलेले असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही उप अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले आहे.