मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. तसेच लोकप्रियतेसाठी कोणत्याही पॅकेजची घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मी एवढच सांगतो आहे की, सुरूवातीला आम्ही तातडीची मदत करतच आहोत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. काही ठिकाणी रस्ते, पूल देखील वाहून गेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे आणखी काही नुकसान झालं असेल, या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन, आपण जे करता येणं शक्य आहे व जे करणं आवश्यक आहे ते सर्व करू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तत्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. मदतीसाठी तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाहीत. मी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी वीमाकवच घेतलं नसेल त्यांनाही मदत करा. यामध्ये तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशी सूचना दिलेली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
वारंवार येणारी संकटांची मालिका आणि संकटं बघितल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण बाहेरची टीम येईल तोपर्यंत इथली टीम मदत कार्याला लागेल. मी हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने आलो. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आहे ना, मग या हेलिकॉप्टरने का आलो? कारण हवामान. काल मी तळयीगावात गेलो. तिथेही पाऊस सुरु झाला होता. अशा हवामानात एनडीआरएफची टीम किंवा इतर टीम पोहोचल्या पाहिजेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्याठिकाणी माणसं जाऊ शकत होती. पण यंत्रसामग्री नेणं कठीण होतं. तिथे रस्तेच नव्हते. रस्ते साफ करुन तिथे यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने तिथे दुर्देवाने टीमला पोहोचायला वेळ लागला”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणची पाहणी केली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.