इक्वेडोरसाठी ऑलिम्पिक इतिहासातील केवळ दुसरे सुवर्ण, रोड रेसमध्ये प्रथमच यश
इक्वेडोरच्या रिचर्ड कॅरपझने शनिवारी पुरुषांच्या ऑलिम्पिक रोड रेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. एकापेक्षा एक दिग्गज रेसर्स असताना त्याने या अनपेक्षित यशावर शिक्कामोर्तब केले. इक्वेडोरसाठी ऑलिम्पिक इतिहासातील हे केवळ दुसरे सुवर्ण ठरले. या देशाने रोड रेसमध्ये अव्वल यश संपादन करण्याची तर ही पहिलीच वेळ ठरली.
कॅरपझला द लोकोमोटिव्ह (स्वयंचलित यंत्र) या टोपण नावाने ओळखले जाते आणि हे टोपण नावच त्याने सिद्ध करुन दाखवले. रिचर्ड कॅरपझ यापूर्वी अलीकडेच संपन्न झालेल्या प्रतिष्ठेच्या टूर दि फ्रान्स स्पर्धेत तिसरा आला होता तर 2019 गिरो डी इटालिया स्पर्धेत त्याने विजेतेपद संपादन केले होते. कॅरपझने उत्तम फरकाने येथे ऑलिम्पिक सुवर्णपदकाची कमाई केली. बेल्जियमच्या वाऊट व्हान अर्टने रौप्य तर स्लोव्हेनियाचा दोनवेळचा टूर विनर तॅदेज पोगोकारने कांस्यपदक जिंकले.
244 किलोमीटर्सच्या या खडतर रेसमध्ये तब्बल 4800 चढ सर करायचे होते. त्यात रिचर्ड सरस ठरला. शेवटच्या 30 किलोमीटर्स अंतरात त्याने अतिशय उत्तम सायकलिंग करत नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपण बरेच पुढे असू, याची त्याने पुरेपूर दक्षता घेतली होती.









