जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. धैर्यशील माने यांची पुरग्रस्त भागाला भेट, दिवसरात ३७५० लोकांना प्रशासनाने सुरक्षितपणे बोटीतुन बाहेर काढले
वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे व परिसरातील नदी काठच्या गावात कृष्णा नदीला आलेल्या महापुराने थैमान घातले असुन, जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. वाळवा गावातील हाळभाग, कोठभाग, पेठभाग पाण्याखाली गेला आहे. शिरगांवला तर शंभर टक्के झळ बसली आहे. जुनेखेड येथेही पाण्याने कहर केला आहे, जुनेखेड गावात पाणी शिरले आहे. नागठाणे गाव ५० टक्के पाण्याखाली गेले आहे. दरम्यान धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने व आलमट्टी धरणातुन मोठा विसर्ग सुरु केल्याने झपाटयाने वाढणारे पाणी आता स्थिर झाल्याने पुरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आज दुपारी ३ वा. जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. धैर्यशील माने यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या बोटीतुन शिरगांव व वाळवा परिसरातील लोकांना भेट दिली, दिलासा दिला. उपसभापती नेताजी पाटील, विजयकुमार पाटील, संग्रामसिंह पाटील, आष्टा अप्पर तहसिलदार अभय देशपांडे, तहसिलदार रविंद्र सबनिस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज सकाळी ११ पर्यंत पाणी गतीने चढत होते दुपारी ३ वा. वाळवा परिसत पाणी पातळी स्थिर झाल्याचे दिसत होते. त्यामुळे पुरग्रस्त समाधान व्यक्त करीत आहेत. वाळव्याचे मंडलाधिकारी प्रफुल्ल माळवदे, तलाठी साहेबराव सुदेवाड यांच्या नेतृत्वाखाली तलाठी टी आर तेली, सागर भोसले, विश्वनाथ भांगे, गणेश हुबाले, देवकुमार कांबळे सहा तलाठी कार्यरत आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एन. डी. आर. एफ.चे २० जवान व २ बोटी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. वाळवा येथे जिल्हा परिषदेमार्फतही २ यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. अशा एकुण ६ बोटी तैनात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. वाळवा गावातुन हाळभाग ११००, कोठभाग १२०० , पेठभाग येथील ८०० अशा ३१०० लोकांना, तर शिरगांव येथील ६५० असे ३७५० लोकांना प्रशासनाने सुरक्षितपणे बोटीतुन बाहेर काढले आहे.
वाळवा गावातील २७० व्यक्तींची रहाण्याची व जेवन खाण्याची व्यवस्था जिजामाता विद्यालय, ग्राम पंचायत परिसर व अन्य एका ठिकाणी वाळवा ग्रामपंचायतीने केली आहे. असे सरपंच डॉ. सौ. शुभांगी माळी यांनी सांगितले आहे. वाळवा आणि शिरगाव पुरग्रस्त लोकांना रेस्क्यू करण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स व एन.डी.आर.एफ.च्या सहकार्याने लोकांना बाहेर काढण्याचे काम सायंकाळपर्यंत चालू हाेते, यामध्ये खास महाबळेश्वर ट्रॅकर्सचे सदस्य संगीता कोळी, अमित कोळी व वाळवा ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक कोळी यांचे सहकार्य लाभले आहे.








