कृष्णानदीची पाणी पातळी 59 फुटांवर, नागरिकांचे स्थलांतर सुरू
प्रतिनिधी / मिरज
मिरज कृष्णाघाटावरील कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ होतच असून, शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 59 फुटांवर पाणी पातळी पोहचली आहे. त्यामुळे कृष्णाघाट परिसराला पूराच्या पाण्याचा वेढा पडला असून, मिरज-अर्जूनवाड पुलावर पाणी आले असल्याने मिरज-अर्जूनवाडचा संपर्क तुटला आहे. कृष्णाघाटाची इशारा पातळी 63 असून, आणखी पाणी वाढल्यास संपूर्ण कृष्णा घाट परिसराला पाण्याचा वेढा पडू शकतो. त्यामुळे नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळणारा संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णानदीला पूर आला आहे. मिरज कृष्णाघाटावर शुक्रवारी रात्री 52 फुटांवर पाणी पातळी होती. त्यामध्ये शनिवार सकाळपर्यंत सात फुटांची वाढ झाली.
सकाळी 11 वाजता पाणी पातळी 59 फुटांवर पोहचल्याने अर्जूनवाड पुलावर पाणी आले आहे. कृष्णाघाटाची धोका पातळी 51 असून, इशारा पातळी 63 आहे. आणखी काही फुट पाणी वाढल्यास संपूर्ण घाट परिसराला पूराच्या पाण्याचा वेढा पडू शकतो. त्यामुळे येथील नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, कृष्णाघाटावर अग्निशमन दल आणि आपत्ती नियंत्रण यंत्रणा दाखल झाली आहे.








