प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी येथील आटेगाव या गावाच्या वरून दूधगंगा धरणाचा उजवा कालवा जातो. गावातील ज्योतिर्लिंग मंदिरासमोरील डावीकडील सर्वे नंबर ३३ ब जमिनीतील कालव्याच्या वरील बाजूस असणारा डोंगर खचून या कालव्यामध्येच ढासळला आहे.
कालव्यात ढासळलेल्या डोंगरामुळे कालव्यातील पाणी पुढे जाणे बंद झाले असून त्याचा दाब पाठीमागील बाजूस असणाऱ्या गावावरील भागात तयार झाला आहे. कालव्यातील पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्याने संपूर्ण पाणी कालवा फुटून संपूर्ण गावावर कोसळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अनेकदा कालव्यातील पाणी घरात पाझरत होते.तर काही वेळा कालवा फूटून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या गावाजवळून जाणारा हा कालवा आरसीसी बाँक्स व मजबूत अस्तरीकरण करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणचा प्रश्न निकाली निघला होता मात्र या डोंगर कालव्यात खचल्याने नवे संकट गावावर कोसळले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत.
सदर घटनास्थळी तलाठी प्रकाश गुरव , व पोलीस पाटील प्रवीण पवार यांनी पाहणी केलेली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









