शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर परीक्षेच्या तयारीला वेग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षण मंत्र्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केल्यानंतर परीक्षेच्या तयारीला वेग आला आहे. या परीक्षेची पूर्व तयारी म्हणून केंद्र संचालक, पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यासाठी येत्या दोन दिवसात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली जणार आहे. त्यानंतर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करून जवळपास 300 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने 8 ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 6 लाख 28 हजार 630 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये 2 लाख 42 हजार 302 विद्यार्थ्यांनी पाचवीच्या, तर 3 लाख 86 हजार 328 विद्यार्थ्यांनी आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील 47 हजार 612 शाळांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. कोल्हापूर जिल्हÎामध्ये महानगरपालिका 2232 व जिल्हा परिषदेच्या 33 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची स्वच्छता, सॅनिटायझेशन केले जाईल. त्यानंतर बैठक व्यवस्था करण्यात येईल, त्यामुळे सध्या असलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा व शहरातील परीक्षा केंद्र व विद्यार्थी
कोल्हापूर महापालिका
पाचवी केंद्र विद्यार्थी
10 1372
आठवी केंद्र विद्यार्थी
9 860
कोल्हापूर जिल्हा
पाचवी केंद्र विद्यार्थी
142 21000
आठवी केंद्र विद्यार्थी
96 12000