आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन : दर्शनासाठी भाविकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात मंगळवारी आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी झाली. प्रशासनाने भक्तांसाठी विठ्ठल मंदिरे खुली केल्याने दर्शनासाठी वर्दळ वाढली होती. दरम्यान कोरोना नियमांचे पालन करून मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱयावषी आषाढी सोहळय़ावर मर्यादा आल्याने मंदिरांमध्ये विठ्ठल नामाचा गजर व टाळ-मृदंगाचा नाद घुमला.
श्री विठ्ठल मंदिर, वडगाव

श्री विठ्ठल मंदिर विकास समिती वडगाव यांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. पहाटे मंदिरात होमहवन व अभिषेक झाला. त्यानंतर दिवसभर भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळपासून मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून परिसरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी भालचंद्र कल्लेद, लक्ष्मण पवार, विकास पोटे, रवि पाटील, उमेश कुसाणे यांसह वारकरी-भक्त उपस्थित होते.
कपिलेश्वर देवस्थान
कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे विष्णू मंदिरात रूद्राभिषेक करून काकडआरती, हरिनाम सप्ताह, पारायण यासह इतर धार्मिक कार्यक्रम झाले. शिवाय आंबेवाडी येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच कीर्तनाचा कार्यक्रमदेखील झाला. यानिमित्ताने दुपारी पालखी दिंडी काढण्यात आली. कपिलेश्वर मंदिरापासून पालखी दिंडीला सुरुवात करून महाद्वार रोड येथील विठ्ठल मंदिरात सांगता करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, राहुल कुरणे, विवेक पाटील, दौलत जाधव, विकास शिंदे, राकेश कलघटगी, तानाजी मुतगेकर आदी ट्रस्टी व वारकरी उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, संभाजी रोड खासबाग
संभाजी रोड खासबाग येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळी 6 वाजता हेस्कॉमचे श्रीनिवास प्रभू, मंदिरचे पुजारी हणमंत कारगी यांच्या हस्ते अभिषेक झाला. यानिमित्ताने मंदिरात दीपोत्सव केला. यावेळी शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मूर्तींचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर ट्रस्टी अप्पय्या बुरूड, नामदेव पिसे, पवन शिवणगेकर, आनंद पाटील, तुकाराम पिसे, सुधीर कालकुंद्रीकर, गजानन प्रभू, विनोद नार्वेकर यांसह वारकरी उपस्थित होते.
श्री जोतिबा देवालय, शिवबसवनगर
शिवबसवनगर येथील श्री जोतिबा देवालयात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी विठोबारूपात आरास करून पूजन केले. यावेळी लक्ष्मण बुणे व इतर सहकारी उपस्थित होते.
श्री मंगाईदेवी मंदिर वडगाव

वडगाव येथील मंगाईदेवी मंदिरात मंगळवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात विठ्ठल-रखुमाई मूर्तींना फुलांची आरास करून पूजन करण्यात आले. यावेळी वारकरी मंडळी उपस्थित
होती.
श्री ज्ञानेश्वरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महाद्वार रोड
महाद्वार रोड येथील श्री ज्ञानेश्वरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मंगळवारी सकाळी महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कोरोना नियमांचे पालन करून मंदिराभवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. तसेच मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी अध्यक्ष मारुती जोशिलकर, सचिव पांडुरंग जाधव, खजिनदार वैशाली हुलजी, दत्तु जटेवाडकर यांसह वारकरी उपस्थित होते.
श्री नामदेव विठ्ठल मंदिर, शहापूर

श्री नामदेव दैवकी संस्था शहापूर यांच्यावतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात महापूजा झाली. पहाटे काकडआरती, अभिषेक, भजन व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हभप मनोहर पाटुकले, अध्यक्ष सतीश हावळ, नितिन हावळ, सूर्यकांत गायडोळे, विनायक काकडे, गणेश काकडे यांसह महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, बापट गल्ली

बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी काकडआरती, अभिषेक व पूजन करण्यात आले. यावेळी निकम दादा, पुणेकर दादा यांच्या नेतृत्वाखाली भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोनाकाळात निःस्वार्थपणे रुग्णांची सेवा केलेले कोरोना योद्धे शंकर पाटील, सुदेश लाटे, विनायक पुजारी यांचा शाल, श्रीफळ व विठ्ठल-रखुमाई प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार अनिल बेनके, अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर, गायकवाड यांसह गल्लीतील पंच, भजनी मंडळ, नागरिक उपस्थित होते. महेश पावले यांनी आभार मानले.
वडगाव दक्षिणमुखी मारुती मंदिरात पूजा

बाजार गल्ली वडगाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मारुतीची विठ्ठल रूपात पूजा करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी मारुती ग्रंथ पूजा, रूद्राभिषेक, शेंदूर पूजा, पान पूजा, लोणी पूजा, दुर्वा फूल अलंकार पूजा झाली. मारुतीला अत्तर लावून हभप वैजनाथ उचुलकर यांनी रूईच्या 108 पानांचा हार घालून पूजन केले. मंदिराचे पुजारी बद्रीनाथ कुलकर्णी यांनी विठ्ठलाच्या रूपामध्ये पूजा बांधली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू कुबसद, सुरेश पिळणकर, हभप वैजनाथ उचुलकर, बेनाळी पाटील यांसह भाविक उपस्थित होते.
बालभजनी मंडळ रयत गल्ली वडगाव

रयत गल्ली वडगाव येथील बालभजनी मंडळातर्फे मंगळवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सकाळी काकडआरती, दुपारी भजन व रात्री प्रवचन हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी पहाटे काकडआरती, दुपारी भजन रात्री हरिपाठ प्रवचन व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गल्लीतील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्ष अमित बिर्जे, मनोहर काजोळकर, भाऊ तारीहाळकर, उत्तम तारीहाळकर, नागेश रेडकर, यल्लाप्पा होसूर यांसह महिला मंडळ व वारकरी उपस्थित होते.









