तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना सभा, मोर्चे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार शब्बीर तांबोळी यांनी फिर्याद दिली. त्यावरून सदर बाजार पोलिस ठाण्यात आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधन दरवाढ तसेच महागाईच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पोषाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकांची फोटो अडकविले होते.
कोरोना संसर्गाच्या भीतीदायक वातावरणात जनहित धोक्यात घालून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच पोलिसांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केले. काय करायचे ते करा आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.