कामावरून कमी केल्याच्या रागातून सहा जणांकडून हल्ला
प्रतिनिधी / पलूस
किर्लोस्करवाडी-कुंडल दरम्यानच्या रस्त्यावर चारचाकी वाहन थांबवून किर्लोस्कर कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आण्णासो हणमंत जाधव (रा. दुधारी) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरोना सांगली एल.सी.बी विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले आहे. किर्लोस्कर कंपनीतून कामावरून कमी केल्याच्या कारणातून प्राणघातक हल्ल्याचे कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
निसार सरदार मुलाणी (२४, किर्लोस्करवाडी नागराळे), अक्षय सुरेश गायकवाड (२५, रा. नागराळे), धर्मवीर उर्फ आप्पा अमृतराव गायकवाड (३५, रा. नागराळे), शुभम शरद जाधव (२५, रा.नागराळे), अशोक हंबीरराव शिंदे (२८, नवी पुणदी), विशाल शिवाजी पवार (३०, रा. नागराळे) अशी आरोपींची नावे आहेत. जखमी डिव्हीजनल मॅनेजर आण्णासो जाधव (रा. दुधारी) हे किर्लोस्कर कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन क्रमांक एम. एच. १० एन ७०६० मधून निघाले असता किर्लोस्करवाडी- कुंडल रोडवरील कोरोकोट कंपनी जवळ आरोपींनी गाडी थांबवून त्यांच्यावर हल्ला चढवला.
जाधव यांना गाडीतून बाहेर ओढत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर हल्लेखोरांनी लागडी दांडके, बेसबॉल स्टीक, पाईपने बेदम मारहाण केली. याचवेळी त्यांच्या चार चाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. जाधव यांच्या हातावर पायावर डोक्यास जबर मार लागला आहे.