मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे. मात्र यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासावर आधारित सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही सीईटी परीक्षा ऐच्छिक असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दहावी निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, वेळापत्रकाबाबतची स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली घेतली जाणार असून, परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून ३ लाख २० हजार ७७९ जागा उपलब्ध होत्या. त्यातीलही ७६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या १६ लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.