येत्या वर्षअखेर तार नदी पूर्णतः उसपली जाईल : पुढील पावसापूर्वी गिरी, सांगोल्डा भागात भरणाऱया पाण्यावर कायमचा तोडगा निघेल
प्रतिनिधी / म्हापसा
चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगोल्डा गिरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. रस्ते, शेती पूर्णतः पाण्याने बुडली आहेत. वाटसरू तसेच वाहनांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक गाडय़ामध्ये पाणी जाऊन गाडय़ा नादुरुस्त झालेल्या आहेत याची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बार्देश तालुक्यातील आजी माजी आमदार, वरिष्ठ अधिकारी वर्ग, जलसंचयन खाते, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गासमवेत येथील भागाची पाहणी केली. येथे रस्त्यावर अडकून पडलेले पाणी बाहेर जाण्यास त्वरित उपाययोजना करावी असा आदेश देत या पाण्यामुळे गिरी तसेच सांगोल्डा भागातील नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला त्याबद्दल जनतेची कृतज्ञता व्यक्त केली. पुढील वर्ष अखेर येथे अडकून राहणाऱया पाणी समस्याबाबत कायमचा तोडगा काढला जाईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी आमदार ग्लेन टिकलो, जोशुआ डिसोझा, जयेश साळगावकर, माजी आमदार दिलीप परुळेकर, सांगोल्डा सरपंच अविनाश नाईक, पंच प्रेमानंद कोचरेकर, पंच सनी नानोडकर, अभियंता बदामी जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, पंच फोंडू नाईक जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गेले 10 दिवस आपण पाहिले की हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी पूर्णतः भरून राहते त्यामुळे या भागातील सहा पंचायतीना याचा फटका बसलेला आहे. दोन्ही ठिकाणी नाले ब्लॉक झाले आहे. बार्देशातील आमदार जिल्हा पंचायत सदस्य, शेती, जलसंचन विभाग, अभियंता आदींना आम्ही बोलावले होते व एकत्रित याची पाहणी केली. या भागात मातीचे भराव टाकले. काही ठिकाणी शेती पुरली गेली हेही एक कारण आहे. येथे माती आहे पाण्याची पातळी वाढते व पाण्याला जाण्यास वाट नसल्याने येथे पाणी अडकून राहिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तार नदीचा गाळ पूर्णतः उसपणार
या पाण्यामुळे ज्या शेतकऱयांना नुकसान सोसावे लागले त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आताच्या घडी छोटे छोटे जे काही करणे शक्य आहे ते करण्यात येईल. मात्र तार नदीतील पूर कायमचा काढणे काळाची गरज असल्याने तार नदी पूर्णतः उपसण्याकडे सरकार लक्ष देणार असल्याची महिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तार नदीत प्रत्येकवेळी पाणी भरून राहते, असे होऊ नये. यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागतो. हे होऊ नये म्हणून आम्ही यापुढे पाऊल उचलून याकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मातीचे भराव टाकणाऱयांकडे पंचायतीने लक्ष द्यावे
आता जे काही करायला पाहिजे ते करणार यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलसंचयन खाते व पीडबल्यूडी चर्चा करून यावर आराखडा काढणार यासाठी पॅप्टन ऑफ पोर्टनाही विश्वासात घेण्यात येईल. त्या जागी पाईप आदी काढून पाण्याची समस्या सोडविली जाईल. काही ठिकाणी शेतीत मातीचे भराव टाकतात त्याकडे पंचायतीने लक्ष द्यावे व मातीचे भराव टाकण्यास देऊ नये याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात येईल अशी माहिती यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नाले व्हाळ गटारे खोदण्याची गरज– आमदार ग्लेन टिकलो (0715map20)
डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे गिरी सांगोल्डा भागात पाणी भरते याची पाहणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणी केली आहे. सर्व बस्तोडा दुसऱया बाजूनी आहे येथे मोठा व्हाळ गटार होता तो खोदण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून हे सर्वांसाठीच सोयीस्कर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार जयेश साळगावकर, गिरी पंचसदस्य यांच्यामध्ये कालवे दुरुस्त करण्याच्या प्रश्नावरून तू तू मै मै (0715map21)
येथील भागात पाणी का भरले या प्रश्नावरून स्थानिक आमदार जयेश साळगावकर, पंच सदस्य फोंडू नाईक, सनी नानोडकर आदीमध्ये ‘तू तू मै मै’चा प्रकार येथे पहायला मिळाला. दोघेही जण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू लागले हे पाहून उपस्थित प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनी याठिकाणी धाव घेऊन त्यांना गराडा घातला व वृत्तवाहिन्याच्या प्रतिनिधीनी ते आपल्या पॅमेरामध्ये कैद केले. यावेळी एरवी दररोज हसणाऱया जयेशच्या चेहऱयावर मात्र संतापाची लाट पहायला मिळाली. जयेशच्या म्हणण्यानुसार पर्रा, म्हापसा, सांगोल्डा आदी भागातील पाणी येते व ते परस्पर बाहेर जाण्यास वाटेअभावी ग्रीनपार्क आदी शेतात पूर्णतः भरून राहते. तार नदी उसपण्याची गरज आहे. येथील पूल खोदण्याची गरज आहे. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत येथे पाणी दरवर्षी रस्त्यावर येणार अशी माहिती आमदार जयेश साळगावकर यांनी दिली. गेली पाच वर्षे पाणी अडकून राहते. स्थानिक आपल्यावर आरोप करतात की, आपण येथे पोचलो नाही. या लोकांनी आपल्यास कधी सांगितले नाही. शेतात हेच लोक शेतीमध्ये भर घालून दुकाने थाटतात मात्र आपण त्याविरोधात काही बोलत नाही. शेतात माती टाकणे हेसुद्धा येथे पूर येण्यामागील एक कारण आहे अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
माती टाकणाऱयावर कारवाई करा
तुम्ही आमगार गिरी भागात भराव टाकून शेत बुझविल्यास याकडे आमदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पंच फोंडू नाईक यांनी सांगितले, ही माती कोण टाकतात त्यावर कारवाई करावीच व बेकायदेशीर घरे मोडून टाका असे ते म्हणाले. गिरी भागात प्रमुख कामे आपण केली असल्याची माहिती फोंडू नाईक यांनी दिली. या भागातून फिरणेही गिरी वासियांना कठीण बनले आहे. अशी माहिती यावेळी फोंडू नाईक यांनी दिली.
कोमुनिदादच्या बेकायदेशीर प्लोटची चौकशी करा– प्रेमानंद कोचरेकर
सांगोल्डाचे पंच सदस्य प्रेमानंद कोचरेकर म्हणाले की, सांगोल्डा पंचायतीने शेतात माती घालून शेती पुरविण्यास दिल्याने येथे पाणी भरले. हा प्रकार कोविडच्या काळात झाला. अनेकजण बेकार झाल्याने काहींनी आपल्या जागेत माती घालून छोटी दुकाने उभारली व व्यवसाय केला. सरकारने त्यांना मदत केली नाही. बारीक गाडे घातले तर आम्ही काय करावे. सांगोल्डा कोमुनिदादमध्ये प्लोट केले व ते बिगर गोमंतकीयांना दिले व कोटय़ावधीत विकले. याची चौकशी करा व नंतर छोटय़ा गरिबावर न्यायालयाने कारवाई करण्यास पुढे यावे असे त्यांनी सांगितले.
आमदारांच्या निष्काळजीपणामुळे गिरीतील नाले भरले– माजी मंत्री दिलीप परुळेकर(0715map23)
गिरी भाग हा सकल भाग आहे. यावर्षी पाणी जास्त प्रमाणात भरते. आपण मंत्री असताना येथील नाला साफ करण्यात आला होता. आता हायवेचे काम करीत असताना अतिरिक्त माती मिळते ती नाल्याच्या तोंडावर वा अन्यत्र टाकली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी भरले आहे. गिरी पंचायत पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. गिरी भागातील नागरिकांना येथून त्याबाजूला जाण्यास त्रास होतो. याला नेमका कारणीभूत म्हणजे आम्ही ज्यांना निवडून देतो. नंतर तो आमदार असो, पंचायत असो वा कुणीही असो. पुढे आम्हाला त्रास होणार आहे हे लक्षात घेऊन येथे पाहणी करणे गरजेचे आहे. येथे दरवर्षी पाणी भरते. स्थानिक आमदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील नाले भरले असल्याचा आरोप यावेळी माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी केला. हे योग्यवेळी दुरुस्त केले असते तर ही परिस्थिती आज आली नसती असे श्री. परुळेकर म्हणाले.
हमरस्त्यावर पूल बांधल्यानेच गिरी भाग पाण्याखाली– फोंडू नाईक(0715map22)
गिरीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य फोंडू नाईक म्हणाले की, गेली 25 वर्षे ही पंचायत आपल्यास निवडून देते. 1999 साली मी सरपंच होतो. हे पाणी पूर्वीच आहे. याला मार्ग खात्यानेच काढायला पाहिजे. हमरस्त्यावर पूल केला आहे त्यामुळे पाणी अडकून राहते. दर महिन्यात पंचायतीत मासिक बैठक होते त्या बैठकीत आपण त्यांच्या नजरेस आणून दिले आहे. येथे संयुक्त तपासणी पीडब्लूडीबरोबर व्हायला पाहिजे. मात्र ही पंचायत गोवा फॉरवर्डची असल्याने त्यांनी आम्ही हे करून घेतले असे सांगितले मात्र त्यांनी काहीच करून घेतले नसल्याचा आरोप फोंडू नाईक यांनी केला.









