जोराच्या पावसात काँग्रेस रोडवर पाणी येण्याचा धोका
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ापूर्वी शहरातील नाल्यांची आणि गटारांची स्वच्छता करण्याची आवश्यकता होती. पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी मराठा कॉलनीमधून वाहणाऱया नाल्यावर बसवेश्वर उड्डाणपुलाच्या खाली कचरा अडकला असल्याने सांडपाणी साचून राहिले आहे. काही नाल्यांच्या स्वच्छतेचे काम अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे रखडले असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.
पावसाळय़ात नाल्यांचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक पावसाळय़ात या समस्या कोणत्या ना कोणत्या परिसरात भेडसावत असतात. यामुळे नाल्यांच्या स्वच्छतेचे काम पावसाळय़ापूर्वी करण्याची मागणी होत असते. पण याकडे आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांकडून दुर्लक्ष झाले आहे. पावसाळा येऊन ठेपला तरी अद्याप नाला स्वच्छता मोहीम महापालिकेने हाती घेतली नाही. बहुतांश नाल्यांमध्ये कचरा साचला असून काही ठिकाणी नाल्यांमध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे पावसाळय़ात पाणी साचण्याची समस्या भेडसावणार का? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
मराठा कॉलनीमधून काँग्रेस रोडशेजारी असलेला नाला बसवेश्वर उड्डाणपुलाखालून वाहतो. पण पुलाच्या खाली नाल्यामध्ये कचरा साचल्याने पाणी वाहण्याचे पूर्णतः बंद झाले आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. मराठा कॉलनी, नानावाडी, स्वामी विवेकानंद कॉलनी अशा विविध परिसरामधून सांडपाणी वाहते. यामुळे पावसाळय़ात नाल्याला मोठय़ा प्रमाणात पाणी असते. नाल्यामधील कचरा काढून स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण याकडे आरोग्य विभागाच्या पर्यावरण अभियंत्यांनी कानाडोळा केला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पुलाच्या खाली अडकलेला कचरा काढून नाला स्वच्छ करण्याची गरज आहे. अन्यथा जोराच्या पावसात काँग्रेस रोडवर पाणी साचण्याचा धोका आहे. मनपा अधिकाऱयांनी तातडीने पाहणी करून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.









