नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याने अस्वच्छता : परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे की अन्य कोठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहराची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याने परिसर अस्वच्छ बनलेला पाहायला मिळत आहे. शहराच्या अनेक भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याला नागरिकच जबाबदार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाग्यनगरमध्ये रस्त्यावर टाकलेला कचरा विखुरला आहे. यासोबतच अनेक झाडे तोडल्यामुळे परिसराला अस्वच्छेतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे याठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी. जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, अशी गरज व्यक्त होत आहे.
मंडोळी रोडवर कचऱयाचे साम्राज्य
मंडोळी रोडवर झाडाखाली ओला आणि सुका कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिक आपल्या घरातील कचरा प्लास्टिक पिशवीत घालून झाडाखाली टाकत असल्याने कचऱयासोबतच प्लास्टिकचे साम्राज्य पसरले आहे. तसेच भटकी जनावरे हा कचरा खात असल्याने प्लास्टिक पोटात जाऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे येथील परिसर अस्वच्छ बनला आहे.
केएलएस शाळेसमोर रस्त्यावरच मद्याच्या रिकाम्या बाटल्या

भाग्यनगर येथे केएलएस शाळेसमोर कचऱयाचा ढीग आहे. मद्यपान करून रस्त्यावरच काचेच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या आहेत. घरातील कचरा घंटागाडीकडे देण्याऐवजी नागरिक रस्त्यावर टाकत असल्याने ही समस्या उद्भवली आहे. मनपाने या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी व वेळेवर कचऱयाची उचल केल्यास कचरा परिसरात विखुरला जाणार नाही.
येळ्ळूर बळ्ळारी नाल्यावर भाजीपाल्याची पोती

येळ्ळूर रोडवरील बळ्ळारी नाल्याच्या पुलावर भाजी मार्केट अथवा शेतातील खराब झालेला भाजीपाला पोत्यात घालून टाकल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. शहरात कचऱयाच्या समस्येने एकूणच गंभीर स्वरूप धारण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना शहर कचरामुक्त करायचे असल्यास योग्य उपाययोजना राबविण्याची गरज आहे.









