53 रुग्ण झाले बरे, दोघांचा मृत्यू : कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. असे असले तरी अजूनही कोरोनाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. मंगळवारी जिल्हय़ामध्ये कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 53 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्हय़ामध्ये 2 हजार 7 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्हय़ामध्ये 77 हजार 81 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 74 हजार 245 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 829 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊननंतर अनलॉक जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य जनता खरेदीसाठी तसेच इतर कामांसाठी बाहेर पडली आहे. बाहेर पडताना अजूनही तोंडाला मास्क तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सुदैवाने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. म्हणून कोणीही बेजबाबदारपणे न वागता काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
मंगळवारी अनगोळ, अंजनेयनगर, एपीएमसी रोड, आझमनगर, भाग्यनगर, कॅम्प, फुलबाग गल्ली-बेळगाव, काळी आमराई, रामनगर, रामतीर्थनगर, शहापूर, शाहूनगर, शास्त्रीनगर, शिवबसवनगर, वंटमुरी कॉलनी या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील पिरनवाडी, कंग्राळी बी. के., केदनूर, मास्तमर्डी, बस्तवाड, गणेशपूर या परिसरात रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत









