रस्त्यांवर पाणी साचले, संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

प्रतिनिधी /कुडचडे
पूर्ण राज्यात गेले दोन दिवस पावसाने ठाण मांडले असून सर्वत्र जोरदार पावसाच्या धारा कोसळत आहेत. सदर पडत असलेल्या पावसाने मंगळवारी कुडचडेत बऱयाच ठिकाणी गटारे तुडुंब भरल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसून आले. मुख्यता वर्षपद्धतीप्रमाणे आंबेडकर सर्कल रस्त्यावर पाणी तुंबल्याने तेथे जणू नाल्याचे स्वरूप आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे लोकांना पाण्यातून दुचाक्या व अन्य वाहने हाकावी लागली. सदर अडचण ज्यावेळेस आंबेडकर सर्कलचे बांधकाम सुरू होते तेव्हापासून प्रत्येक पावसाळय़ात वाहनचालकांना सहन करावी लागलेली असून त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी संबंधित खात्याने लक्ष घालावे, अशी मागणी लोकांकडून होत आहे. तसेच मुसळधार पावसाच्या तडाख्यात मंगळवारी सकाळी कुडचडे येथील शेल्डेकर हॉस्पिटलसमोरील कुडचडे रेल्वे स्थानकाच्या कंपाऊंडचा काही भाग कोसळून पदपथावर पडला. सुदैवाने तो भाग कोणावर कोसळला नाही. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात लोकांची वर्दळ बरीच कमी दिसून आली.









