सोमवार ठरला अत्यंत दिलासादायक नव्या बाधितांची संख्याही केवळ 108
प्रतिनिधी /पणजी
जवळपास तीन महिन्यानंतर राज्यात प्रथमच काल सोमवारी कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. गोव्याला या दिनाची सुमारे 100 दिवस वाट पाहावी लागली. यामुळे सोमवारचा दिवस हा गोव्यासाठी अत्यंत फार मोठा दिलासा देणारा ठरला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
गोवा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे द्योतक आहे. सलग तीन महिन्यात गोव्यात सुमारे 2500 जण कोरोनाचे बळी ठरल्यानंतर प्रथमच सोमवारी कोरोनाबाधितांपैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
बाधितांच्या प्रमाणातही घट
सरकारने जारी केलेल्या आकडय़ानुसार सोमवारी नव्याने 108 जणांना बाधा झाली आहे आणि केवळ 23 व्यक्तींना सोमवारी इस्पितळात दाखल करण्यात आले. दिवसाकाठी 3 ते 4 हजारजण नवे बाधित असायचे. आता हे प्रमाण केवळ 108 पर्यंत पोहोचलेले आहे. तर एकूण बाधितांची संख्या जी मे महिन्यात 30 हजार पर्यंत पोहोचलेली, सोमवारी ती केवळ 1770 पर्यंत खाली उतरली.
शंभर दिवसांत कोरोनामुळे 2500 बळी
गोवा सरकारने या अगोदरच कोविड केअर सेंटर्स बंद केली आहेत. आता केवळ गोमेकॉचे सुपरस्पेशालिटी आणि मडगावचे जिल्हा इस्पितळ यामध्ये कोविड रुग्णांना दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार होतात. गेल्या 100 दिवसांत सुमारे 2500 जणांनी प्राण गमावले. अशा या घातक आजाराने गोव्यात सर्वत्र कहर माजविला.
पंधरा दिवसांपासून संसर्ग कमी
मार्चपासून बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली आणि एप्रिल अखेरीस कोरोनाने कहर गाठला. त्यात दगावणाऱयांचे प्रमाण दिवसाला 70 ते 75 पर्यंत पोहोचले. गेल्या 15 दिवसांत कोरोना बाधितांचे प्रमाण खाली उतरण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर कोरोनाने मरण पावणाऱयांचे प्रमाणही खाली उतरले व ते सोमवारी शून्यावर येऊन पोहोचले.
…परंतु सावधान राहावे लागेल : आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण सोमवारी शून्यावर येऊन पोहोचल्याने अत्यंत समाधान व्यक्त केले आणि आनंदही व्यक्त केला. या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो, असे ते म्हणाले. कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आल्याचा हा जरी पुरावा असला तरी देखील आम्हाला बिनधास्त राहता येणार नाही. अद्याप काही राज्यांत अचानकपणे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तसेच विविध प्रकार आता निर्माण होऊ लागलेत ही बाब गंभीर आहे. आम्हाला सातत्याने सतर्क राहावे लागेल.
संभाव्य तिसऱया लाटे विरुद्ध सज्ज!
संभाव्या तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सारी यंत्रणा सज्ज आहे. आम्ही सर्व तयारी करुन ठेवलेली आहे. तसेच आता यानंतर कधीही ऑक्सिजन कमी पडणार नाही या करीता तयारी करुन ठेवलेली आहे. कोरोना नियंत्रणात आला असला तरी देखील आम्हाला फार काळजी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.









