ऑनलाईन टीम
भारत विरुद्ध श्रीलंका संघात एकदिवसीय मालिका १३ जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, मालिका सुरू होण्याआधीच मालिकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मालिकेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ‘क्रिकबज’वर देण्यात आली आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील सर्व काळजी घेतली जात असतानाही श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे निर्धारित वेळापत्रकात आता बदल करण्यात येणार आहे. १३ जुलैपासून ही एकदिवसीय मालिका सुरू होणार होती. पण आता ही मालिका १७ किंवा १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाकडून लवकरच मालिकेचं नवे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने होणार आहेत.
Previous Articleयंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
Next Article ‘सीपीआर’चे ‘किचन’ व्हेंटिलेटरवर..!









