ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणा-यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीष बापट, आमदार ॲड. अशोक पवार आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हयाने कोविड लसिकरणाचा पन्नास लाखाचा टप्पा पार केला याबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे. निष्कारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलीस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. पुणे जिल्हयात मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापरण्याची नितांत गरज आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबतही दक्षता घ्यावीच लागणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.