‘मोदी हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत पंतप्रधानांचा निषेध
प्रतिनिधी / सातारा :
‘मोदी हटाव, देश बचाव’, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कमिटीच्यावतीने जोरदार सायकल रॅली काढत निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली.
काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनात विजय कणसे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अजित चिखलीकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, मालनताई परळकर, सुषमाराजे घोरपडे, सातारा तालुकाध्यक्ष माधुरी जाधव, रजनी पवार, रोहिणी यादव, दीपाली यादव, बानुबी शेख, माधुरी चव्हाण यांनी काँग्रेस कमिटी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढली. तेथे मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश जाधव म्हणाले, मोदींच्या काळात जो काय कारभार झाला आहे. त्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सामान्य लोकांच्या अवाक्याच्या बाहेर गेलेले आहे. लोकांना दिलासा देण्याचे कोठेही आपल्याला दिसत नाही. करोडो रुपयांची लुट सुरु आहे. म्हणून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल रॅलीचे नियोजन करुन लोकांचा उद्रेक जनतेपर्यंत पोहचवला जातो. पेट्रोल, डिझेलवर 18 रुपये रस्ते विकास असेल चार रुपये कृषी सेस घेतले जातात. मोदी सरकारने डिझेल, पेट्रोलवर एक्साईज डय़ुटी लावली आहे. तब्बल 7 वर्षात 22 कोटी नफा मिळवला आहे. अशा परिस्थिती 100 रुपये पेट्रोल पार करुन आणि गॅस सिलिडंर 850 पार करुन लोकांच्या आवाक्याचे बाहेरचे काम केलेले आहे.









