चुका दुरुस्तीसाठी मनपाकडेच अर्ज करावा लागणार
प्रतिनिधी / बेळगाव
जन्म व मृत्यू दाखला घेण्यासाठी महापालिका कार्यालयात पायपीट करावी लागते. तसेच दाखल्यातील चुकांच्या दुरुस्तीसाठी कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागतात. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी प्रशासनाने आता अन्य प्रमाणपत्रांप्रमाणेच जन्म व मृत्यू दाखलादेखील सेवासिंधू
ऍपवर ऑनलाईन उपलब्ध केला आहे.
जन्म व मृत्यू दाखला प्रत्येकांसाठी गरजेचा आहे. शहरातील खासगी रुग्णालयात किंवा घरी जन्म-मृत्यू झाल्यास महापालिकेकडे नोंद करून प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र सरकारी रुग्णालयातील जन्म-मृत्यूच्या नेंदी एक वर्षानंतर महापालिकेकडे पाठविल्या जातात. त्यामुळे एक वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयामधूनच जन्म-मृत्यूचे दाखले घ्यावे लागतात. काहीवेळा शुल्क भरूनदेखील वेळेत दाखला मिळत नसल्याने नागरिकांना फेऱया माराव्या लागतात. दाखल्यामध्ये चुका झाल्यास दुरुस्तीसाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबविण्यासाठी जन्म-मृत्यू दाखले ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. अलीकडेच सेवासिंधू ऍपवर जन्म-मृत्यू दाखले वितरित केले जात आहेत. शहरातील विविध ठिकाणी ही सेवा उपलब्ध असून त्या ठिकाणी जन्म-मृत्यू दाखल्याचा नेंद क्रमांक किंवा अन्य माहिती दिल्यास दाखला मिळू शकतो. ही सेवा आता बेळगाव वन कार्यालयात देखील उपलब्ध करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने चालविला आहे. ऑनलाईन डिजिटल जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. पण जन्म झालेल्या बाळाचे नाव नोंद करण्यासाठी अथवा चुकीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडेच अर्ज द्यावा लागणार आहे.









