जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, कावळानाका येथील घटना
आईच्या शरिराचे तुकडे करुन केली होती निर्दयी हत्या, माणूसकीला काळीमा फासणारी घटना
प्रतिनिधी / कोल्हापूर
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईचा शरिराचे तुकडे करुन आईचे काळीज खाणाऱ्या नराधम मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश कृष्णात जाधव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सुनिल रामा कुचकोरवी (वय 35 रा. कावळा नाका, माकडवाला वसाहत) असे त्याचे नाव आहे. 28 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हि हृदय यद्रावक घटना माकडवाला वसाहत येथे घडली होती. यामध्ये यलव्वा रामा कुचकोरवी (वय 62 रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका) असे मृत आईचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 28 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सुनिलने आई यलव्वा यांच्याकडे दारुसाठी पैश्याची मागणी केली. मात्र यलव्वा यानी पैसे देण्यास नकार दिल्याने सुनिलने आईस ठार केले. अत्यंत निर्दयीपणे चाकु, सुरु, सत्तुरने आईच्या शरिरावर वार करुन शरिराची उजवी बाजू पुर्णपणे कापून फाडून काढली. तिच्या शरिराचे हदय, यकृत, आतडी, कोथळा असे अवयव बाहेर काडून ते किचन कटÎावर एका परातीमध्ये ठेवले होते. तर आईचे काळीज चटणी, मिठ, तेल खाण्याचा प्रयत्न केला होता.
पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस हवालदार तानाजी चौगुले, विलास गेंजगे, यांच्यासह त्यांच्या टिमने या घटनेचा तपास करुन सुनिल कोरवी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले हेते. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. या घटनेचे एकूण 34 साक्षीदार होते. यापैकी 12 साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनिल कुचकोरवी शुक्रवार (2 जुलै) रोजी दोषी ठरवले होते. 6 जुलै रोजी सरकारी वकीलांनी सुनिलला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. गुरुवारी सकाळी 10. 30 वाजण्याच्या सुमारास सुनिलला प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले. 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश कृष्णात जाधव यांच्यासमोर शिक्षेच्या सुनावणीस सुरुवात झाली. स्वतःच्या आईची तुकडे करुन हत्या करुन आरोपीने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. या आरोपीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही. समाजमन ढवळुन निघालेली हि घटना समाजाला रुचणारी नाही. समाजातील अशा व्यक्तिंवर जरब बसण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी होणार नाही. यामुळे या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी भारतीय दंड संहितेनुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली. तसेच 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी लक्ष्मण लोहार, सुरेश परीट यांनी या खटल्याच्या साक्ष, तसेच पुरावे नेण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली.
घटनाक्रम
28 ऑगस्ट 2017 दुपारी 1 च्या सुमारास यलव्वा कुचकोरवी यांचा निर्घुण खुन
28 ऑगस्ट 2017 सायंकाळी 7 वाजता सुनिल कुचकोरवीस अटक
21 नोव्हेंबर 2017 रोजी सुनिल विरोधात दोषारोपपत्र दाखल
30 डिसेंबर 2017 रोजी दोष निश्चीती
26 ऑगस्ट 2019 सुनावणी सुरु
2 जुलै 2021 रोजी खून प्रकरणात सुनिल दोषी
6 जुलै 2021 रोजी सरकारी वकीलांकडून फाशीची मागणी
8 जुलै 2021 रोजी न्यायालयाकडून सुनिलला फाशीची शिक्षा
15 हजारांचे बक्षीस, न्यायालयाकडून कौतुक
माणूसकीला काळीमा फासणाऱया या घटनेच तपास अत्यंत बारकाईने आणि सुक्ष्म केल्याने आरोपीला फाशीची शिक्षा झाली. याबद्दल पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाला पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले. तर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनावणीनंतर जिल्हा सरकारी वकील ऍड. विवेक शुक्ल, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे अभिनंदन केले.
– निर्विकार चेहरा आणि कुटूंबियांच्या अश्रूचा बांध फुटला
सुनावणी सुरु झाल्यापासून आरोपी सुनिल कुचकोरवी निर्वीकार चेहऱयाने पोलीस बंदोबस्तामध्ये उभा होता. तो हात जोडून न्यायाधीशांकडे बघत होता. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या चेहऱयावर कोणतेच हावभाव नव्हते. न्यायालयाच्या दारात थांबलेल्या त्याच्या पत्नी, दोन मुलासह, नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांना एकच रडू कोसळले.
अत्यंत निर्दयीपणे स्वतःच्या आईची हत्या आरोपीने केली होती. मृतदेहाची विटंबना करुन त्याने किळसवाणा प्रकार केला होता. यामुळे त्याला फाशीची शिक्षा होणेच गरजेचे होते. या शिक्षेमुळे समाजातील अशा प्रवृत्तींना जरब बसेल. अशी प्रतिक्रिया जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी व्यक्त केली.
– जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल
तपासामध्ये पारंपारिक तंत्रज्ञानासोबत आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्यंत बारकाईने या घटनेचा तपास केला. तपासामध्ये केवळ रक्ताचे नमुने गोळा न करता डिएनए तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पुरावे आणि साक्षीदारांची साखळी अत्यंत योग्यपद्धतीने जोडण्यात आली. अत्यंत जलदगतीने दोषारोपपत्र दाखल केले.
– पोलीस निरीक्षक संजय मोरे
आजपर्यंत गाजलेले खटले व त्यामधील फाशीची शिक्षा
1. नेर्ले (ता. जयसिंगपूर) 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना 2008 मध्ये घडली होती. या प्रकरणी बाबु कांबळे या आरोपीस दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. अशोक रणदिवे यांनी बाजू मांडली. 2. बायकोच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घुण खून केल्यानंतर पोटच्या दोन मुलांना रंकाळ्यात फेकून ठार मारण्याचा प्रयत्न शिवाजी जोती रणदिवे याने केला होता. 2014 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी होवून आरोपी शिवाजी जोती रणदिवे यास फाशीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. अशोक रणदिवे यांनी बाजू मांडली. 3. आरोपी अशोक अतिग्रे याने खून केला होता. वकीलांचा तिहेरी खून केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. भास्करराव सुर्यवंशी यांनी बाजू मांडली. 4. राज्यासह देशाचे मन हेलावून टाकणारे बालहत्याकांड कोल्हापूर येथे घडले होते. या प्रकरणी अंजना, रेणु, सिमा गावित यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुप्रिम कोर्टापर्यंत ही शिक्षा कायम राहिली. यामध्ये सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. 5. उदगांव (ता. शिरोळ) येथे एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला होता. यातील आरोपी तरुणास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे ऍड. दिलीप मंगसुळे यांनी बाजू मांडली होती. |