क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद दोनवेळा मिळविलेल्या चेन्नईन एफसीने यंदा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्याशी करार केला आहे. मागील आयएसएल फुटबॉल मोसमात देबजित ईस्ट बंगाल संघाकडून खेळला होता. गेल्या मोसमात त्याने 15 सामन्यांत खेळताना दोन वेळा क्लीन शीट्स ठेवली होती तर 50 गोला वाचविले होते.
सध्या 24 वर्षीय विशाल कैथ हा चेन्नईनच्या संघात असून 33 वर्षीय अनुभवी देबजित लवकरच संघात सामिल होईल. देबजित अनुभवी गोलरक्षक असून त्यांच्या अनुभवाचा फायदा विशाल कैथला निश्चितच होईल, असे चेन्नईन एफसीच्या सहमालक विता दाणी म्हणाल्या.
कोलकातातील देबजित प्रथम उत्तरपारा नेताजी ब्रिगेड संघाला खेळल्यानंतर तो ईस्ट बंगाल, मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी संघालाही खेळला आहे. चेन्नईन एफसीसाठी खेळण्यास मी उत्सूक असल्याचे देबजित म्हणाला. संघातील विशाल कैथ हा एक उत्कृष्ट गोलरक्षक आहे. आम्हीही दोघेही चेन्नईन एफसीसाठी चांगला निकाल आणू, असे देबजित मजुमदार म्हणाला. देबजितने एटीकेलाल 2016 आयएसएल फुटबॉल मोसमातील जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यापूर्वी तो मोहन बागानच्या 2015 आणि 2020 आय-लीग आणि 2016 फेडरेशन चषक जेतेपदाचा एक भागही होता.









