98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी/ मुंबई
हिंदी सिनेमातील गेल्या 75 वर्षातील स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार तथा महम्मद युसूफ खान यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृध्दापकाळाने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. गेल्या महिन्यातही त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यातून ते बरे झाले झाले होते, मात्र 29 जून रोजी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 7 जुलै रोजी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी अभिनेत्री सायराबानो होत्या.
कलाकारांसह चाहत्यांनी घेतले अत्यंदर्शन

डॉ. जलील पारकर यांनी दिलीपकुमार यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त जाहीर करताच दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसह संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीपकुमार यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. बॉलिवूडमधील धर्मेंद्र, शबाना आझमी, शाहरुख खान, अनुपम खेर, करण जोहर, विद्या
बालन आदी कलाकारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. बुधवारी सायंकाळी मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दिलीपकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षभर प्रकृतीमध्ये चढउतार होता सुरु
हिंदी सिनेमासृष्टीत ट्रजिडी किंग या नावाने ओळखले जाणाऱया दिलीपकुमार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या सिनेसृष्टीतील सहकारी व कलाकारांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. पण प्रचंड सकारात्मक असलेल्या दिलीपकुमार यांनी वेळोवेळी उपचारांना प्रतिसाद दिला.
दिलीप कुमार यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली
नवी दिल्ली ः महान अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोनवरून पंतप्रधानांनी धीर दिला. ‘दिलीपकुमार यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द एक महान आख्यायिका म्हणून लक्षात राहील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढय़ांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे निघून जाणे आपल्या सांस्कृतिक जगतासाठी एक मोठा झटका आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली’ असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.









