वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिलांच्या वनडे ताज्या मानांकनात फलंदाजांमध्ये भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने पुन्हा अग्रस्थान पटकाविले आहे. इंग्लंडबरोबर नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मिताली राजने दर्जेदार कामगिरी करताना तीन अर्धशतके झळकवले असून आठव्यांदा तिने पहिले स्थान मिळविले आहे.
38 वर्षीय मिताली राजने वनडे मानांकनातील अग्रस्थान जवळपास तीन वर्षानंतर पुन्हा मिळविले आहे. इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत मिताली राजने पहिल्या सामन्यात 72, दुसऱया सामन्यात 59 आणि तिसऱया सामन्यात नाबाद 75 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मितालीने 2018 फेब्रुवारीमध्ये वनडे मानांकनात पहिले स्थान मिळविले होते. त्यापूर्वी म्हणजे 2005 एप्रिलमध्ये तिने पहिल्यांदा अग्रस्थान पटकाविले होते. या ताज्या मानांकन यादीत भारताची शफाली वर्मा 71 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची झुलन गोस्वामी 53 व्या तर अष्टपैलूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा 12 व्या स्थानावर आहे.









