लसीकरण, विनामूल्य चाचणी करण्याच्या दिल्या सूचना
बेंगळूर/प्रतिनिधी
देशात येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने सर्व राज्ये तयारी करत आहेत. दरम्यान, कर्नाटकात केएएस अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कोरोना कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये राज्यात प्रथमदर्शी कामगारांना लसीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर करणे, अधिक केंद्रावर प्रत्येकासाठी मोफत चाचणी देणे आणि प्रभाग किंवा ग्रामीण पातळीवर पाळत ठेवणे यासाठी पथके तैनात करणे ही कर्नाटक प्रशासकीय सेवेद्वारे तयार केलेल्या कृती योजनेतील काही उपाय आहेत. कोरोनाच्या तिसर्या लहरीचा संभाव्य प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी कर्नाटकातील केएएस अधिकाऱ्यांनी कृती आराखडा करून उपाय सुचविले आहेत.
केएएस अधिकारी डॉ. वैष्णवी के. या बेंगळूर स्मार्ट सिटी लिमिटेड येथे विशेष अधिकारी म्हणून पूर्णवेळ पदावर कार्यरत आहेत. दरम्यान निराधार, वृद्धाश्रमातील लोक, इतरांसह प्राधान्य गट तयार करून लसीकरण करण्याचे धोरण आहे.
डॉ. वैष्णवी के. यांनी आखलेल्या कृती योजनेत असे म्हटले आहे की पोलिओचे डोस जसे दिले जातात या धर्तीवर कोरोना विरुद्ध लसीकरण मोहिमेचा विस्तार वाढवून विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. दरम्यान, लसीकरण हा कोरोना संसर्ग रोखण्याचा सर्वात तर्कशुद्ध मार्ग आहे. किमान लोकसंख्येच्या ८० टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. तर उर्वरित २० टक्के लोकांना मागील कोविड संसर्गापासून प्रतिपिंडेपासून संरक्षण मिळाले आहे.
एप्रिलच्या सुरुवातीस जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्य सरकारला सर्व प्रौढांसाठी “घरो घरी जाऊन सक्तीची लसीकरण मोहीम” सुरू करण्याची विनंती केली होती. “राज्यात कर्फ्यू सुरू असल्याने, सरकारने परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यावा व सर्व प्रौढ व्यक्तींना डोर-टू-डोर सक्तीचे लसीकरण सुरू करावे जेणेकरून लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल असे मी सुचवितो.” असे ते म्हणाले.









