बी.एड. कॉलेजचे प्राचार्य उभे ठाकले : प्रवेशासाठी कुलगुरुंची आडकाठी : उच्चशिक्षण विभागाचा आदेश धुडकावला
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊन काळात काही विद्यार्थ्यांना बी. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, असा आदेश उच्चशिक्षण विभागाने देऊनही चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून प्रवेशासाठी आडकाठी घातली जात आहे. कुलगुरुंच्या या मनमानी कारभाराविरोधात बी. एड. कॉलेजचे प्राचार्य उभे ठाकले आहेत. त्यांनी थेट राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करत प्रवेशाची वाट मोकळी करून देण्याची मागणी केली आहे.
डी. एड. व बी. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना कोरोनामुळे प्रवेश घेता आला नाही. परंतु या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी 2020-21 या वर्षाकरिता प्रवेश द्यावा, असा आदेश जुलै महिन्यात उच्चशिक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आला. बेळगावच्या चन्नम्मा विद्यापीठांतर्गत 45 बी. एड. कॉलेज आहेत. या नव्या आदेशानुसार 600 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया करून घेता येणार नाही, अशी आडकाठी भूमिका चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु रामचंद्रेगौडा यांनी घेतली आहे.
वाद पेटण्याची चिन्हे
दोन दिवसांपूर्वी बेळगाव परिसरातील बी. एड कॉलेजच्या प्राचार्यांनी कुलगुरुंची भेट घेऊन त्यांना प्रवेश सुरू करण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी प्राचार्यांचे ऐकून न घेताच प्रवेश प्रक्रिया होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेने विद्यार्थी व प्राचार्यांमधून संताप व्यक्त होत आहे. उच्चशिक्षण विभागाने दिलेल्या आदेशालाच कुलगुरु हरताळ फासत असल्याचे दिसून येत असल्याने पुढील काळात हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱया बी. एड. कॉलेजच्या प्राचार्यांनी कुलगुरूंच्या मनमानी कारभाराची तक्रार थेट राज्याचे उच्चशिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. इतर विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली असताना चन्नम्मा विद्यापीठाचा नकार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.









