माजी गुप्तहेराचा मोठा खुलासा- माजी अध्यक्षांच्या भावावर ठेवला ठपका
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
हॉलिवुडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिया मर्लिन मुन्रोचा मृत्यू आज देखील पूर्ण जगासाठी रहस्य आहे. मर्लिनचे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि त्यांचे बंधू बॉबी केनेडी यांच्यासोबत कथित प्रेमसंबंध होते. मर्लिन यांच्या वयाच्या 36 व्या वर्षातील मृत्यूनंतर त्याला आत्महत्या ठरविण्यात आले होते. पण आता माजी गुप्तहेर माइक रोथमिलर यांनी मर्लिनला बॉबी केनेडी यांनी एक अत्यंत गोपनीय विष दिले होते असा दावा केला आहे.
या टॉप सीक्रेट विषाची निर्मिती अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएनेच केली होती. मर्लिन मुन्रोला अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या भावासोबतच्या प्रेमसंबंधांविषयी जाहीर वाच्यता करण्यापासून रोखण्यासाठी बॉबी केनेडी यांनीच विष दिले होते असे रोथमिलर यांनी म्हटले आहे. कित्येकदा नैराश्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनासाठी कुख्यात राहिलेल्या मर्लिन मुन्राने 4 ऑगस्ट 1962 रोजी विषप्राशन करत आत्महत्या केल्याचे अधिकृत स्वरुपात म्हटले गेले होते.
विवाहित आयुष्य जगणारे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्यासोबतच्या मुन्रोच्या प्रेमसंबंधांची कधीच पुष्टी होऊ शकलेली नाही. तरीही रोथमिलर यांनी स्वतःच्या आगामी पुस्तकात एक गोपनीय पोलीस डोजियरबद्दल माहिती दिली आहे. हे डोजियर लॉस एंजिलिस पोलीस विभागाच्या आर्काइव्हमध्ये ठेवण्यात आले होते.
या विभागात केनेडी परिवाराच्या तीन फाइल्स होत्या. मर्लिनवर पोलीस नजर ठेवून होते, तिचा फोन टॅप करण्यात येत होता. तिच्या घरात काय बोलले जातेय हे जाणून घेण्यासाठी विशेष उपकरणे बसविण्यात आली होती असे रोथमिलर यांनी म्हटले आहे.
मर्लिन मुन्रोचे नाव जॉन एफ. केनेडींपासून गायक प्रँक सिनात्रा आणि बेसबॉलपटू जो डिमॅगियो यांच्यासोबतही जोडले गेले होते. मर्लिन यांनी अनेक विवाह केले, जे फारकाळ टिकले नव्हते.









