प्रतिनिधी / खेड
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व नाबार्ड ऑल इंडिया युनियनचे सरचिटणीस अॅड. विजय भोसले (६०) यांचे पुणे येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या अॅड. भोसले यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. जन्मभूमी प्रतिष्ठानची निर्मिती करत तालुक्यातील बचतगटांना उभारी देण्यात त्यांचे मौलिक योगदान होते. गरजूंना सदैव मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी होते. काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून संघटना बळकटीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत पक्षश्रेष्ठीने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धूरा सोपवली होती.
ही जबाबदारी हाती घेतल्यानंतर जिल्हयात विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकसंघ करत जिल्हा काँग्रेसला नवी उभारी दिली. अनेकदा आंदोलने देखील केली. नाबार्डच्या माध्यमातून कामगारांच्या न्यायहक्कासाठीही त्यांच्या अविरतपणे लढा सुरू होता.









