वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोरील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक एच आर ए ए ७८५४) वरील चालकाचा ताबा सुटल्याने शनिवारी रात्री नऊ वाजता झालेल्या अपघातामध्ये तिघे जखमी झाले. सदर कंटेनरने दुभाजक व कंटेनर समोरून जाणाऱ्या कार क्रमांक ( एम एच ०९ बीएम १९८७) ला धडक देत रस्त्याच्या कडेला एका बाजूस पलटी झाला.सदर अपघातामध्ये कंटेनर चालक हकिम अब्दुल वाहिद (वय वर्षे ३० रा.रामपूर ता. सदर जि.प्रतापगड, उत्तर प्रदेश), सुरेश शंकरराव नलवडे (वय वर्षे३१ रा. हनुमान नगर, उजळाईवाडी) व कार चालक कुणाल हितेंद्र पाटील (वय वर्ष २७ रा.राजारामपुरी, कोल्हापूर ) हे तिघे जण जखमी झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातामध्ये ७५ हजार रुपयांची वित्तहानी झाली.
अपघात स्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक व सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमींना दवाखान्यात हलविले. कंटेनर चालक हकिम अब्दुल वाहिद याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवून अपघातास कारण ठरल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. सदर अपघाताची फिर्याद जखमी सुरेश नलवडे यांनी दिले असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सनदी करीत आहेत.
पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार कंटेनर पुण्याच्या दिशेने जात होता परंतु अपघातामध्ये त्याचे तोंड बेंगलोर च्या दिशेने झाले परंतु अपघात ग्रस्त कारचे मात्र पुढील बाजूने नुकसान झाले त्यामुळे कंटेनर कोणत्या दिशेने जात होता याबाबत स्थानिक नागरिक उलट सुलट चर्चा करीत होते.