गायिका ते संगीतकार या प्रवासाबद्दल काय सांगशील ?
संगीतकार होणं हे माझं खूप आधीपासूनच स्वप्न होतं. खरं सांगायचं तर गायिका होण्याआधी मला संगीतकार होण्याची इच्छा होती आणि ‘जून’च्या निमित्ताने हे स्वप्न सत्यात अवतरत आहे. 2019मध्ये पाच आठवडय़ांसाठी मी बर्क्लीला एज्युकेशन टूरसाठी गेले होते. तिथे एका सॉंग राइटर शोकेसमध्ये माझी निवड झाली. त्यात मी स्वतः शब्दबद्ध केलेलं आणि संगीत दिलेलं ‘लव्ह यू डबल’ हे इंग्रजी गाणं सादर केलं होतं. त्याचं थेट प्रक्षेपण निखिल महाजनने बघितलं असल्याने त्याने मला मेसेज केला, की ‘जून’ नावाच्या चित्रपटाची मी निर्मिती करतोय आणि यात मला तुझं हे गाणं हवं आहे. तेव्हा पहिल्यांदा मला कोणी माझ्या संगीत रचनेवर प्रतिक्रिया दिली होती. माझ्या गाण्यांसाठी अनेकदा माझ्यावर कौतुकांचा वर्षाव होतो. परंतु यावेळेस माझं कौतुक लेखनासाठी झालं होते. त्याचा मला खूप आनंद होता. निखिलची ही ऑफर मी स्वीकारली होती मात्र त्याला ‘जून’साठी मी दुसरं गाणं देणार असल्याचे सांगितले. बॉस्टनहून आल्यावर मी निखिलला भेटले आणि माझा संगीतकार म्हणून प्रवास सुरु झाला. पाच आठवडय़ांच्या शैक्षणिक सहलीत मला इतकं मोठं काम करण्याची संधी मिळाली.
संगीतकाराच्या प्रवासातील एखादी अविस्मरणीय आठवण?
‘जून’मधील तीन गाण्यांची रचना करताना ‘बाबा’ आणि ‘हा वारा’ या गाण्यांची मी आधी चाल बांधली आणि मग शब्द लिहिले गेले. त्यावेळी मला असं वाटलं, की अशा पद्धतीने माझं काम होईल. मी आधी चाल लिहिणार आणि मग त्यावर शब्द येणार. परंतु ‘पार गेली’ या गाण्याच्या बाबतीत शब्द मला आधी मिळाले आणि ते घेऊन मला त्याची संगीत रचना करायची होती. त्यामुळे मी जरा विचारात होते आणि मला आठवतंय त्यावेळी बाहेर पाऊस पडत होता. मी घरात गिटार घेऊन वेगवेगळ्या संगीत रचनांचा प्रयोग करत होते. या प्रयोगादरम्यान त्या ओळी एका संगीत रचनेत तंतोतंत जुळल्या. त्या मी गुणगुणून जितू सरांना आणि निखिलला पाठवल्या. त्यांनाही हे संगीत आवडले. त्यानंतर जितू सरांनी गाणे पुढे लिहायला सुरुवात केली.
‘जून’च्या निमित्ताने तू ‘प्लॅनेट मराठी’सोबत जोडली गेली आहेस?
मराठी भाषेची परंपरा जपत, ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘प्लॅनेट मराठी’,
अव्हिस्टा कॅपिटल कंपनीचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि मला विशेष आनंद होतोय, की ‘जून’च्या निमित्ताने मी ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या ओटीटीसोबत जोडली गेले. त्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांचे आभार मानते.









